पुणे शहरात कर्णकर्कश आवाजाचा कहर! शांतता हरवली, नागरिक हैराण!

51

पुणे, २८ फेब्रुवारी २०२५: पुणे शहरात सध्या कर्णकर्कश आवाजाचा कहर सुरू आहे. बुलेट आणि स्पोर्टस् बाईकला लावलेले मॉडिफाइड हॉर्न आणि सायलेन्सरमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या आवाजामुळे शहरात ध्वनिप्रदूषणाची पातळी वाढली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
शहरातील अनेक भागांतून बुलेट आणि स्पोर्टस् बाईक भरधाव वेगाने चालवली जात आहे. या वाहनांना लावलेले मॉडिफाइड हॉर्न आणि सायलेन्सरमुळे मोठ्या प्रमाणात आवाज निर्माण होत आहे. यामुळे शहरातील शांतता भंग पावली असून, नागरिक हैराण झाले आहेत.

विशेष म्हणजे, महापुरुषांच्या जयंती उत्सवातही दुचाकीस्वारांचे जथ्थेच्या जथ्थे हॉर्न वाजवत आणि फटाके फोडत फिरत असतात. रुग्णालये, विद्यापीठे, न्यायालये आणि शैक्षणिक संस्थांच्या परिसरातही मोठ्या प्रमाणात आवाज होत आहे. या परिसरांना राज्य शासनाने ‘सायलेंट झोन’ म्हणून घोषित केले आहे. मात्र, या नियमांचे पालन होताना दिसत नाही.

नवीन मोटार वाहन कायद्यानुसार, प्रेशर हॉर्न वाजवल्यास १० हजार रुपये दंड आणि सायलेंट झोनमध्ये हॉर्न वाजवल्यास २ हजार रुपये दंड आकारला जाऊ शकतो. मात्र, प्रशासनाकडून या नियमांची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही.

‘अनकट ’ ने केलेल्या पाहणीत शहरातील अनेक मुख्य रस्त्यांवर रुग्णालये आणि शाळा असल्याचे दिसून आले. मात्र, या ठिकाणी सायलेंट झोनचे बोर्ड लावलेले नाहीत. तसेच, हॉर्न वाजवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी प्रशासनाकडे पुरेसे मनुष्यबळ नाही.

या गंभीर समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – सोनाली तांबे