पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रभाग रचनेवर आलेल्या हरकती आणि सूचनांवर आजपासून (गुरुवार, दि. ११) सुनावणी सुरू झाली आहे. या सुनावणीमुळे शहरातील राजकीय वातावरण तापले असून, सर्वांचे लक्ष या निर्णयाकडे लागले आहे.
महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर एकूण ५,९२२ हरकती आणि सूचना आल्या आहेत. या हरकतींवर राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांच्यासमोर बालगंधर्व रंगमंदिर येथे सुनावणी होणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या सुनावणीमध्ये आज प्रभाग क्रमांक १ ते २९ मधील हरकतींवर १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत, तर शुक्रवारी प्रभाग क्रमांक ३० ते ४१ मधील हरकती आणि सूचनांवर १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुनावणी होईल.
पुणे महापालिकेतील नगरसेवकांची संख्या आता १६५ असून, एकूण ४१ प्रभाग आहेत. यापैकी ४० प्रभाग चार सदस्यीय, तर आंबेगाव-कात्रज प्रभाग (क्र. ३८) पाच सदस्यीय आहे.
या प्रभाग रचनेवर राजकीय वर्तुळातून जोरदार टीका झाली आहे. भाजपने ही रचना आपल्या सोयीनुसार केल्याचा आरोप केला जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राष्ट्रवादीच्या बैठकीत यासंदर्भात नाराजी व्यक्त केल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाने या प्रारूप रचनेवर हरकती नोंदविल्या आहेत. यामुळे अनेक माजी नगरसेवकही हरकती नोंदवण्यासाठी पुढे आले आहेत. या प्रभाग रचनेत मोठा राजकीय हस्तक्षेप झाल्याचा आरोप होत असल्याने, सुनावणीतून काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे












































