पुणे औद्योगिक न्यायालयाने पिंपरी चिंचवड येथील एक्साईड इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या सुमारे २५८ संपकरी कामगारांना मोठा दिलासा देणारा ऐतिहासिक आदेश दिला आहे. न्या. डी. एम. पाटील यांच्या खंडपीठाने या कामगारांना त्यांच्या संपकाळातला नियमित पगार देण्याचे महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. हा आदेश केवळ संपकाळापुरता नसून, भविष्यातही लागू राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे, ज्यामुळे कामगारांना मोठा आर्थिक आधार मिळाला आहे.
एक्साईड परिवर्तन कामगार संघटनेने कंपनी व्यवस्थापनाच्या विरोधात दाखल केलेल्या तक्रारीवर हा निकाल आला आहे. कामगारांचे वकील अॅड. संजीव म्हसे यांनी न्यायालयात बाजू मांडताना, कंपनीने अनुचित कामगार प्रथेचा वापर केल्याचे सिद्ध केले. या आधारावर न्यायालयाने हे कठोर पाऊल उचलले आहे.
या आदेशात न्यायालयाने कंपनीतील कायम कामगारांच्या जागी कंत्राटी कामगार नेमण्यास मनाई केली आहे. इतकेच नव्हे तर, मोटरसायकल विभागासह तेथील यंत्रसामग्री अन्यत्र हलवण्यावरही बंदी घातली आहे. कंपनी व्यवस्थापनाने संप सुरू झाल्यापासूनचा नियमित पगार येत्या १५ दिवसांत द्यावा आणि पुढील काळातही तो नियमितपणे द्यावा, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. हा आदेश अंतिम निकाल लागेपर्यंत कायम राहणार आहे.
या विजयाचे श्रेय संघटनेने कामगार नेते राजन नायर, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील आणि इतरांना दिले आहे. एक्साईड परिवर्तन कामगार संघटनेचे सरचिटणीस गोविंद वांजळे यांनी हा निर्णय ‘संपूर्ण कामगार वर्गाच्या आत्मसन्मानाचा क्षण’ असल्याचे सांगून कामगारांच्या संयमाचा व एकजुटीचा विजय असल्याचे म्हटले आहे.
दुसरीकडे, एक्साईड इंडस्ट्रीज लिमिटेडच्या मनुष्यबळ विभागप्रमुख संतोष चव्हाण यांनी न्यायालयाच्या निकालाचे अवलोकन करून कायदेशीर बाबी तपासून पुढील निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. कामगारांच्या बाजूने लागलेला हा निकाल देशातील कामगार चळवळीसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे
