Lohegaon cyber fraud: पुणे शहरात सायबर गुन्हेगारांनी आता थेट नागरिकांना ‘नफा’ देऊन फसवणुकीचा नवा फंडा अवलंबला आहे. लोहगाव परिसरात एका ४३ वर्षीय व्यक्तीला शेअर बाजारात गुंतवणुकीचे आकर्षक आमिष दाखवून तब्बल २६ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या चोरट्यांनी सुरुवातीला तक्रारदाराला काही प्रमाणात परतावा देऊन विश्वास संपादन केला आणि नंतर मोठी रक्कम घेऊन पोबारा केला. या घटनेमुळे सायबर चोरट्यांच्या वाढत्या हिमतीचा आणि फसवणुकीच्या नवनवीन पद्धतींचा धक्कादायक अनुभव समोर आला आहे.
सुरुवातीला परतावा, मग गायब
लोहगावमधील साठे वस्तीत राहणाऱ्या तक्रारदाराला २८ मार्च रोजी अज्ञात सायबर चोरट्यांनी संपर्क साधला. त्यांनी एका मोबाईल ॲप्लिकेशनची लिंक पाठवून त्याद्वारे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला. इतकेच नव्हे, तर सुरुवातीला काही प्रमाणात मोबदला देऊन तक्रारदाराचा विश्वास जिंकला. यानंतर, अधिक नफ्याच्या लालसेपोटी तक्रारदाराने टप्प्याटप्प्याने तब्बल २६ लाख रुपये ऑनलाइन माध्यमातून गुंतवले. मात्र, ही रक्कम जमा होताच सायबर चोरट्यांनी संपर्क तोडला आणि तक्रारदाराला कोणताही परतावा दिला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने तातडीने विमानतळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे.
याव्यतिरिक्त, फुरसुंगी परिसरातही अशाच प्रकारे फसवणुकीच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. एका ३७ वर्षीय व्यक्तीला सोशल मीडियावर पार्ट-टाइम जॉबचे आमिष दाखवून एका ग्रुपमध्ये सामील केले. विविध ‘टास्क’ पूर्ण करण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून ३ लाख ८ हजार ६०० रुपये उकळले आणि केवळ १३ हजार ८०० रुपये परत देऊन २ लाख २४ हजार ८०० रुपयांचा गंडा घातला.
दुसऱ्या घटनेत, फुरसुंगीतीलच एका ४३ वर्षीय व्यक्तीला ट्रेडिंग, शेअर्स खरेदी-विक्री आणि आयपीओमध्ये गुंतवणुकीचे स्वप्न दाखवण्यात आले. ‘शिवांगी अगरवाल’ आणि ‘विकास सिंघानिया’ या कथित ट्रेडस्मार्ट कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून या व्यक्तीला २ फेब्रुवारी ते २० मार्च दरम्यान ७ लाख रुपये गुंतवण्यास सांगितले. सुरुवातीला थोडाफार नफा मिळाल्याने विश्वास बसलेल्या या व्यक्तीने मोठी रक्कम गुंतवली आणि नंतर फसवणूक झाली.या घटनांमुळे सायबर चोरट्यांचे जाळे किती खोलवर पसरले आहे आणि ते नागरिकांना कशा प्रकारे आपल्या जाळ्यात ओढत आहेत, हे स्पष्ट होते. पोलिसांनी या प्रकरणांचा कसून तपास सुरू केला असून, नागरिकांनी कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या आमिषाला बळी न पडण्याचे आणि ऑनलाइन गुंतवणुकीपूर्वी योग्य खातरजमा करण्याचे आवाहन केले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी,सोनाली तांबे