गोल पोस्ट इतर पर्यावरण पुण्यातील डेटा सायंटिस्टने बाल्कनीत उभारलं ५००+ झाडांचं मिनी जंगल

पुण्यातील डेटा सायंटिस्टने बाल्कनीत उभारलं ५००+ झाडांचं मिनी जंगल

मानसी दानुखे;

Balcony garden in Pune: पुण्यातील डेटा सायंटिस्ट मानसी दानुखे यांना सुरुवातीला एकही रोपटं लावता येत नव्हतं. पण आज त्यांच्या घरच्या दोन बाल्कनीत ५०० पेक्षा जास्त झाडं, फुलं, फर्न आणि इतर वनस्पतींनी नटलेलं एक सुंदर मिनी जंगल आहे. कसं केलं त्यांनी हे? चला, त्यांच्या प्रवासाबद्दल आणि काही सोप्या टिप्स जाणून घेऊया.

सुरुवात कशी झाली?
मानसी सांगतात, “कोरोनानंतर वर्क फ्रॉम होम सुरू झाल्यावर मला शांत आणि प्रसन्न जागा हवी होती. माझ्या बाल्कनीतून मला ती शांती मिळाली.” त्या त्यांच्या बागेत बसून ऑनलाइन मीटिंग्ज घेतात, जिथे हिरवळ त्यांना सर्जनशीलता आणि शांतता देते.
२०१६ पर्यंत मानसीनी कधीच झाडं लावली नव्हती. पण त्यांच्या जोडीदाराच्या वन्यजीव फोटोग्राफीच्या आवडीमुळे त्यांना बागकामाची गोडी लागली. त्यांनी दोन मोठ्या बाल्कनी असलेलं घर निवडलं; एक १५० आणि दुसरी १८० स्क्वेअर फूटची. सुरुवात फक्त २-३ रोपट्यांपासून झाली, आणि हळूहळू त्यांची बाग वाढत गेली.

Mansi Danukhe transformed her balcony into a 500+ plant jungle using compost and smart gardening tips. A perfect example of urban gardening in Pune.

सुरुवातीच्या अडचणी;
मानसी म्हणतात, “सुरुवातीला मी नर्सरीतून सुंदर दिसणारी झाडं आणायचे, पण ती काही दिवसांतच सुकायची.” यामुळे त्यांनी प्रत्येक झाडाबद्दल अभ्यास सुरू केला. डेटा सायंटिस्ट म्हणून त्यांनी त्यांचा अनुभव बागकामात वापरला. “मी झाडांच्या अडचणी समजून घेतल्या. जास्त सूर्यप्रकाश, जास्त पाणी, किंवा किडींचा प्रादुर्भाव या गोष्टी जाणून घेतल्या. मग मी योग्य झाडं, खतं निवडली. सूर्यप्रकाशापासून संरक्षणासाठी ग्रीन नेट आणि किडींसाठी लिंबाच्या पाण्याचा वापर केला,” अस त्या सांगतात.
पहिली तीन वर्षं चाचपणी आणि चुकांमधून गेली. यातून त्यांना प्रत्येक झाडाची गरज समजली. उदाहरणार्थ, सक्क्युलेंट्सना दररोज पाणी नको, आठवड्यातून एकदाच पुरतं. तसंच, त्यांनी बाल्कनीतील फर्निचरही पावसात खराब होणार नाही असं बदललं.

लॉकडाऊनचा फायदा:

लॉकडाऊनच्या काळात मानसी आणि त्यांचा जोडीदार यांनी झाडांची जास्त काळजी घेतली. यावेळी त्यांनी बोगनविलिया, जेरेनियम, थनबर्गिया, मॉर्निंग ग्लोरीसारखी फुलझाडं, तसंच फिलोडेंड्रॉन, पोथोस, टिलँडसिया आणि ५० हँगिंग प्लँट्ससह स्पॅनिश मॉससारख्या हवेत वाढणाऱ्या वनस्पती लावल्या. “ही झाडं कमी देखभालीची आहेत, पण रोज त्यांची पानं तपासायला लागतात आणि पिवळी किंवा सुकलेली पानं काढावी लागतात ,” असं मानसी सांगतात.

स्वतःचं खत;
आधी मानसी सोसायटीच्या कंपोस्टरवर अवलंबून होत्या, पण नंतर त्यांनी स्वतः कंपोस्टिंग सुरू केलं. “आता मी कधीच बाजारातून खत विकत घेत नाही. स्वयंपाकघरातील ओला कचरा, सुकलेली पानं आणि कोको पीट यापासून मी खत तयार करते. याला फक्त एक महिना लागतो,” त्या सांगतात. हे खत द्रव किंवा कोरड्या स्वरूपात वापरता येतं.

मनीषींच्या टिप्स;

  • झाडांची निवड: तुमच्या हवामानाला आणि जागेला अनुकूल झाडं निवडा.
  • सूर्यप्रकाशाचं नियोजन: जास्त सूर्यप्रकाश टाळण्यासाठी ग्रीन नेट वापरा.
  • कीटक नियंत्रण: लिंबाच्या पाण्याची फवारणी किडींपासून संरक्षण करते.
  • कंपोस्टिंग: स्वयंपाकघरातील कचऱ्यापासून स्वतःचं खत बनवा.
  • दैनंदिन देखभाल: झाडांची पानं रोज तपासा, सुकलेली पानं काढा.

बागेचं महत्त्व;
मानसीच्या व्यस्त दिनचरेत बागकाम त्यांना आनंद आणि उत्पादकता देतं. “झाडांमध्ये वेळ घालवला की मला ताजंतवानं वाटतं,” त्या म्हणतात. त्यांच्या ५००+ झाडांनी त्यांच्या बाल्कनीचं खऱ्या अर्थाने जंगलात रूपांतर केलं आहे, जिथे शुद्ध हवा आणि शांत वातावरण आहे. तुम्हीही मानसीसारखं छोट्या जागेत बाग बनवू शकता! फक्त एक रोपटं लावून सुरुवात करा आणि तुमचं हिरवं स्वप्न साकार करा.

न्यूज अनकट प्रतिनिधी; प्रज्ञा शिंदे

error: Content is protected !!
Exit mobile version