तत्पर पासपोर्ट देण्यात पुणे विभाग सुसाट ! तीन महिन्यात ४० हजार पारपत्र वितरित

पुणे, ९ एप्रिल २०२३: बंगळूरुनंतर आयटी क्षेत्रात पुण्याला आलेले महत्त्व अन् परदेशात मिळणाऱ्या संधीचे सोने करण्यासाठी पुणे पासपोर्ट कार्यालयात तरुण गर्दी करीत आहेत. त्यात केंद्रात चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रात दिलेल्या सवलतीचा फायदा घेत पुण्यातील बहुतांश तरुण-तरुणी पैसा कमाविण्यासाठी विदेशला पसंती देत आहेत. याच कारणावरून सर्वांत मोठ्या संख्येने पासपोर्ट देणारे म्हणून पुणे शहराची आता ओळख निर्माण झाली आहे.

उच्च शिक्षणाचा फायदा घेऊन पैसा कमाविण्यासाठी तरुण विदेशला पसंती देत आहेत. यासाठी वेळप्रसंगी कुटुंबीयांशी विरोध पत्करून अनेक तरुण विदेशी कंपन्यांशी करारबद्ध होत आहे. व्हिसा मिळवण्यासाठी विदेशी कंपन्यांबरोबर अनेक देशही सवलतींचा वर्षाव करत आहेत. क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी डॉ. अर्जून देवरे यांनी सांगितले की, या वर्षी पासपोर्ट सेवा केंद्र पुणे येथे सामान्य व तत्काळ योजनेच्या अपॉइंटमेंट प्रतिदिन वाढविण्यात आल्या आहेत.

नागरिकांच्या सेवेसाठी दररोजच्या एकूण २४०५ अपॉइंटमेंट दिल्या जातात. त्यात सामान्य पासपोर्ट साठी १९७०, तत्काळ पासपोर्ट साठी २९० आणि पीसीसी १४५ साठी वितरित होतात. त्यामुळे क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालयाने पासपोर्ट सेवा केंद्र, पुणे येथे दैनंदिन तत्काळ अपॉइंटमेंटची संख्या १०० वरुन २५० पर्यंत वाढवली आहे. डॉ. देवरे यांनी सांगितले आहे की यामुळे तीन महिन्यांत ४० हजार पासपोर्ट वितरित करण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा