‘साहेब, तुमची फेव्हरेट डिश कोणती?’ जिल्हा परिषद शाळेत शिक्षणाधिकाऱ्यांच्या भेटीत हशा पिकला!

pune District education officer zp school inspection student ask funny question made everyone laugh

What is Your Favorite Dish?: नेहमी शिक्षकच विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतात, पण मावळ तालुक्यातील सोमाटणे येथील जिल्हा परिषद शाळेत आज वेगळेच चित्र पाहायला मिळाले. पुणे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी अचानक शाळेला भेट दिली. ते चौथ्या वर्गातील विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांची तयारी, वाचन, लेखन, इंग्रजी स्पेलिंग आणि पाढे तपासत होते.

प्रश्न-उत्तरांच्या या सत्रात अचानक मेघा पंडित या धाडसी विद्यार्थिनीने नाईकडे साहेबांनाच विचारले,“What is your favorite dish?” एका क्षणासाठी संपूर्ण वर्ग शांत झाला, आणि खुद्द साहेबही थोडे गोंधळले! पण क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी हसत उत्तर दिले, “गुलाबजामून!”

What is your favorite dish?
pune district education officer zp school inspection student-ask-funny-question-made-everyone-laugh

या उत्तराने वर्गात एकच हशा पिकला आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. शिक्षणाधिकाऱ्यांचे उत्तर ऐकून काही मुलांनी “माझं पण आवडतं!” अशी कुजबुज सुरू केली. या अनपेक्षित पण मजेशीर प्रसंगाने वर्गातील वातावरण अधिकच खेळीमेळीचे झाले.

नाईकडे यांनी केवळ मुलांच्या अभ्यासाचीच नाही, तर शाळेची स्वच्छता, इमारतीची सुविधा आणि ग्रामस्थांचा सहभाग यांसारख्या गोष्टींचीही पाहणी केली. त्यांनी करण चव्हाण या विद्यार्थ्याच्या भाषणाचे कौतुक केले, तसेच मुख्याध्यापिका पुष्पा घोडके यांच्या कार्यपद्धती आणि शाळेच्या सुंदर इमारतीबद्दलही प्रशंसा केली. या भेटीदरम्यान गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळूज आणि केंद्रप्रमुख अशोक मिसाळ यांच्यासह अनेक अधिकारी आणि पालकही उपस्थित होते. या घटनेने शिक्षणाधिकारी आणि विद्यार्थ्यांमधील जवळीक वाढल्याचे दिसून आले.

न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे