रात्री १० ते सकाळी ६ फटाके वाजवण्यास सक्त मनाई

‘अ‍ॅटमबॉम्ब’वरही बंदी, नियमांचे उल्लंघन केल्यास थेट कारवाईचा इशारा

यंदाची दिवाळी ‘शांत आणि सुरक्षित’ पद्धतीने साजरी करण्यासाठी पुणे शहर पोलिसांनी कंबर कसली आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाके विक्री स्टॉल आणि फटाके वाजवण्याबाबत कठोर नियमावली जाहीर केली आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा थेट इशारा देण्यात आला आहे.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत फटाके वाजवण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. ध्वनी आणि वायू प्रदूषण टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हे नियम लागू करण्यात आले आहेत.

या नियमांनुसार, मोठा आवाज करणारे ‘अ‍ॅटमबॉम्ब’ वाजवणे, बाळगणे तसेच त्यांची विक्री करणे यावरही पूर्णपणे बंदी आहे. याशिवाय, शहरातील रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि न्यायालयांच्या १०० मीटर परिसरामध्ये ‘शांतता क्षेत्र’ (Silence Zone) घोषित करण्यात आले आहे. या शांतता क्षेत्रांमध्ये दिवसा आणि रात्री कोणत्याही वेळी फटाके वाजविण्यास सक्त मनाई आहे.

फटाके विक्रेत्यांसाठीही नियमावलीचे पालन करणे बंधनकारक आहे. पुणे शहर परिसरात केवळ २० ते २४ ऑक्टोबर या कालावधीतच तात्पुरत्या स्वरुपात फटाके विक्रीस परवानगी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, महामार्गावर, पुलांवर फटाके वाजवणे आणि अग्निबाण (रॉकेट) उडवण्यासही मनाई करण्यात आली आहे.
पुणेकरांनी नियमांचे पालन करून ‘शांततेत आणि सुरक्षित’ दिवाळी साजरी करावी, असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे