‘एक्साइज’चा दणका! पुणे जिल्ह्यात दारूमाफियांची तंतरली; सहा महिन्यांत ३,५७४ ‘माफिया’ गजाआड, १०.७५ कोटींचा मुद्देमाल जप्त

अवैध दारूधंदे आणि दारू तस्करांवर पुणे जिल्हा उत्पादन शुल्क विभागाने (एक्साइज) गेल्या सहा महिन्यांत (एप्रिल ते सप्टेंबर २०२५) धडक कारवाईचा बडगा उगारला आहे. तत्कालीन अधीक्षक चरणसिंग राजपूत यांच्यापाठोपाठ विद्यमान अधीक्षक अतुल कानडे यांनीही मोहीम तीव्र केल्याने ‘दारूमाफियां’ना गुडघे टेकावे लागले आहेत. या सहा महिन्यांच्या विक्रमी कारवाईमुळे दारूविक्रेत्यांची अक्षरशः ‘तंतरली’ आहे.

या सहामाही कालावधीत विभागाने तब्बल २,९७५ गुन्ह्यांची नोंद केली असून, ३,५७४ संशयितांना अटक केली आहे. कारवाईत १७६ वाहनांसह एकूण १० कोटी ७५ लाख ९६ हजार ७१६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा गुन्ह्यांच्या नोंदीत ३० टक्क्यांनी, तर अटक केलेल्या संशयितांमध्ये ६८ टक्क्यांनी मोठी वाढ झाली आहे. या वाढीव कारवाईने एक्साइज विभागाने आपला ‘वॉच’ किती कडक केला आहे, हे सिद्ध होते.

गोवा तस्करीवर ‘वज्र’!

परराज्यातून (गोवा) होणारी दारू तस्करी रोखण्यासाठीही एक्साइजचे भरारी पथक सक्रिय झाले आहे. केवळ सहा महिन्यांत गोवा दारूतस्करीच्या १० प्रकरणांमध्ये २४ संशयितांना अटक करून तब्बल २ कोटी ८५ लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे, जी गतवर्षीच्या तुलनेत ५७ टक्क्यांची वाढ दर्शवते.

शिवाय, ढाबे किंवा अवैध ‘गुत्त्यां’वर दारूबंदी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवरही कारवाई करत २८५ प्रकरणांत ८१ संशयितांना अटक केली आहे. अधीक्षक अतुल कानडे यांनी स्पष्ट केले आहे की, अवैध दारूधंदे आणि तस्करांवर एक्साइज विभागाचा वॉच यापुढेही कायम राहणार असून, ही कारवाई सुरूच राहील.

न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे