‘डेट’ला नकार दिल्याने संताप! एआयने मॉर्फ केलेले तरुणीचे अश्लील फोटो व्हायरल, मुंबईतून संशयिताला अटक

तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करत एका एमबीए शिक्षण घेणाऱ्या तरुणीचे एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) वापरून मॉर्फ केलेले अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बावधन पोलिसांनी मुंबईतील विरार येथून चिराग राजेंद्र थापा (२१) या तरुणाला अटक केली आहे.

बावधन परिसरात २५ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ही घटना घडली. पीडित २३ वर्षीय तरुणीची ओळख आरोपी चिराग थापा याच्याशी ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून झाली होती. ओळख वाढल्यानंतर आरोपीने तरुणीला ‘डेट‘वर येण्याचे व ‘गर्लफ्रेंड‘ बनण्याचे विचारले, परंतु तिने स्पष्ट नकार दिला.

या नकाराने संतापलेल्या आरोपीने बदला घेण्याच्या उद्देशाने तरुणीच्या नावाने तब्बल १३ बनावट इन्स्टाग्राम प्रोफाइल्स तयार करून तिची बदनामी सुरू केली. एवढ्यावरच न थांबता त्याने एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने तिचे अश्लील मॉर्फ केलेले फोटो तयार केले आणि ते सोशल मीडियावर व्हायरल केले. इतकेच नव्हे तर, हे विकृत फोटो त्याने तरुणीच्या कुटुंबीयांना आणि मित्र-मैत्रिणींनाही पाठवले.

पोलिसांच्या तपासात असेही उघड झाले आहे की, आरोपीने तरुणीच्या इतर मैत्रिणींचेही बनावट फोटो बनवून ‘तिला माझ्याशी बोलायला सांगा’ अशा धमक्या दिल्या होत्या.

पीडित तरुणीने बावधन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल विभुते यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने तांत्रिक तपास करून संशयित चिराग थापाला रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील वांगणी येथून जेरबंद केले. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली असून, पोलिस निरीक्षक (गुन्हे) भास्कर कदम अधिक तपास करत आहेत.

न्यूज अनकट  प्रतिनिधी सोनाली तांबे