गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे बनावट बक्षीसपत्र रद्द, ज्येष्ठ नागरिकाला मालमत्तेचा हक्क परत मिळाला

बनावट बक्षीसपत्र रद्द, ज्येष्ठ नागरिकाला मालमत्तेचा हक्क परत मिळाला

आजवर प्रॉपर्टीसाठी आई-वडिलांना वृद्धाश्रमात सोडणाऱ्या मुलांच्या घटना आपण पाहिल्या आहेत. मात्र, पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाला त्याच्या स्वतःच्या मुलांनीच बनावट बक्षीसपत्र तयार करून घराबाहेर काढल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर अन्नछत्रात राहण्याची वेळ आलेल्या त्या वडिलांना तब्बल तीन वर्षांनी न्याय मिळाला आहे.

तीन वर्षांची कायदेशीर लढाई

मुलांनी सुरुवातीला वडिलांचा विश्वास जिंकून त्यांची काळजी घेऊ असे सांगितले. मात्र, गुपचूप खोटे बक्षीसपत्र तयार करून त्यांनी घरावर कब्जा केला. कागदपत्रे पूर्ण झाल्यानंतर वडिलांना घराबाहेर काढण्यात आले. यामुळे ते अक्षरशः रस्त्यावर आले आणि अन्नछत्रात राहू लागले.

या अन्यायाविरुद्ध अॅड. प्रकाश एकनाथ सिंदेकर आणि अॅड. प्रणाली रामदास बारगळ यांनी पुढाकार घेतला. त्यांनी पुण्याच्या दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला. तब्बल तीन वर्षांच्या सुनावणीनंतर न्यायालयाने मुलांचे बनावट बक्षीसपत्र रद्द केले आणि वडिलांना पुन्हा मालमत्तेवरील हक्क मिळवून दिला.

समाजासाठी संदेश

अॅड. प्रकाश सिंदेकर यांनी सांगितले की, “हा केवळ एक दावा नव्हता, तर ज्येष्ठ नागरिकांच्या न्यायासाठीचा लढा होता. आई-वडिलांच्या आयुष्यभराच्या कमाईवर मुलांनी डल्ला मारणे ही अत्यंत निंदनीय बाब आहे. या निर्णयामुळे सर्व ज्येष्ठ नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.”

हा निर्णय समाजाला एक स्पष्ट संदेश देतो – गैरप्रकाराने मिळवलेली मालमत्ता कायद्यासमोर कधीच टिकत नाही आणि न्यायासाठी लढणे आवश्यक आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे

error: Content is protected !!
Exit mobile version