Family dispute leads murder Conviction Wadgaon Mavala : कौटुंबिक कलहातून झालेल्या एका भीषण गुन्ह्यात वडगाव मावळ सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. २०२१ मध्ये तळेगाव दाभाडे येथे सासूचा गळा आवळून खून करून मृतदेह नाल्यात फेकून देण्याच्या प्रकरणात सुनेला सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे, तर खुनासाठी मदत करणाऱ्या मुलालाही १८ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. न्यायाधीश जे. एल. गांधी यांनी हा निकाल दिला.
मिळालेल्या माहितीनुसार, पूजा शिंदे (जन्मठेपेची शिक्षा झालेली सून) हिने आपल्या सासूचा ब्लाऊजने गळा आवळून खून केला. त्यानंतर दोन दिवस मृतदेह पोत्यात बांधून टेरेसवर ठेवला. मृतदेहातून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी विचारणा केली. त्यावेळी पूजाने पती मिलिंद शिंदे याच्या मदतीने तो मृतदेह नाल्यात फेकून दिला.
या प्रकरणाचा तपास करत असताना देहूरोड विभागाचे सहायक पोलिस आयुक्त बाळासाहेब कोपनर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप रायन्नावार, तत्कालीन तपासी अधिकारी नारायण पाटील, अविनाश गोरे यांनी महत्त्वपूर्ण पाठपुरावा केला. विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्त झालेल्या स्मिता मुकुंद चौगुले यांनी वैद्यकीय आणि इलेक्ट्रॉनिक पुराव्यांसह साक्षीदारांची साक्ष आणि सर्वोच्च तसेच उच्च न्यायालयांचे न्यायनिवाडे सादर करत जोरदार युक्तिवाद केला.
न्यायालयाने सर्व साक्षी-पुरावे आणि युक्तिवाद ग्राह्य धरत पूजा शिंदे हिला सश्रम जन्मठेप आणि दहा हजार रुपये दंड, तर तिचा पती मिलिंद शिंदे याला १८ महिने तुरुंगवास आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणामुळे कौटुंबिक वादाचे गंभीर परिणाम पुन्हा एकदा समोर आले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे