कला, संस्कृती आणि मनोरंजनाची भव्य मेजवानी घेऊन पुणे फेस्टिव्हलचे यंदाचे ३७ वे वर्ष पुण्यात दाखल होत आहे. २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या काळात हा महोत्सव श्री गणेश कला-क्रीडा रंगमंच, बालगंधर्व रंगमंदिर आणि कलादालन येथे आयोजित करण्यात आला आहे. दहा दिवसांचा हा सोहळा पुणेकरांसाठी पूर्णपणे विनामूल्य असणार आहे.
पुणे फेस्टिव्हल केवळ एक कार्यक्रम नसून, तो कला, संस्कृती, गायन, वादन, नृत्य, संगीत, क्रीडा आणि पर्यटन यांचा अनोखा संगम आहे. या वर्षीच्या महोत्सवात विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. महिलांसाठी खास लावणी कार्यक्रम, पद्मश्री हेमामालिनी यांच्या ‘ड्रीम गर्ल’ गाण्यांवर आधारित सादरीकरण, तसेच ‘व्हॉइस ऑफ पुणे फेस्टिव्हल’ सारख्या स्पर्धांचा समावेश आहे.
या महोत्सवात ‘आविष्कार भारती’ द्वारे हिंदी-उर्दू-पंजाबी नाटकांची मेजवानी मिळणार आहे. याव्यतिरिक्त, बालसंगीत महोत्सव, केरळ महोत्सव, मराठी नाटके, जुळ्यांचे संमेलन आणि कविसंमेलने असे अनेक मनोरंजक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. अभंग-लावणींच्या मैफली, नृत्य स्पर्धा आणि ‘मिसेस पुणे फेस्टिव्हल’ यांसारखे कार्यक्रम देखील रसिकांचे मन जिंकणार आहेत.
पुणे फेस्टिव्हलचे सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख मोहन टिल्लू यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य संयोजक अॅड . अभय छाजेड आणि इतर मान्यवर उपस्थित होते. हा सोहळा पुणेकरांना सांस्कृतिक आस्वाद देईल आणि शहराची कला-परंपरा अधिक समृद्ध करेल, यात शंका नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे












































