पुण्याच्या वैभवशाली गणेशोत्सवात ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’ आणि ‘इंद्राणी बालन फाउंडेशन’ यांनी एक अभिनव उपक्रम राबवला आहे. गणेशभक्तांना चांगल्या आरोग्याचा लाभ मिळावा या उद्देशाने, त्यांच्यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाला ‘आरोग्योत्सवाचा जागर’ असे नाव देण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये गणेशभक्तांना अनेक महत्त्वाच्या तपासण्यांचा लाभ घेता येणार आहे. यामध्ये सीबीसी, कोलेस्टोरॉल, क्रेटिन, एसजीओटी, एसजीपीटी, आरबीएस, ब्लड, युरिन, बिलीरुबिन यांसारख्या तपासण्यांचा समावेश आहे. या तपासण्यांचे अहवाल थेट मोबाईलवर उपलब्ध करून दिले जाणार आहेत, ज्यामुळे भक्तांना त्वरित माहिती मिळेल.
हे आरोग्य शिबिर ५ सप्टेंबरपर्यंत दररोज सकाळी ११ ते संध्याकाळी ५ या वेळेत सुरू राहील. तपासणीसाठी इच्छुक असलेले गणेशभक्त थेट शिबिराच्या ठिकाणी नावनोंदणी करू शकतात किंवा ऑनलाइन नोंदणीसाठी https://bit.ly/Aarogyashibir या लिंकचा वापर करू शकतात. ट्रस्टचे उत्सवप्रमुख पुनीत बालन यांनी सांगितले की, ‘आपल्या अध्यात्माचा पाया भक्तांचे चांगले आरोग्य आहे. याच हेतूने आध्यात्मिक उत्सवात आम्ही आरोग्योत्सवाचा जागर करत आहोत.’ त्यांनी जास्तीत जास्त गणेशभक्तांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे












































