गणेश विसर्जनासाठी पुणे महापालिकेची यंत्रणा सज्ज दोन हजार कर्मचारी, जीवरक्षक, आणि विशेष सोयीसुविधा

मागील दहा दिवसांपासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाची सांगता शनिवार, ७ सप्टेंबर रोजी विसर्जन मिरवणुकीने होत आहे. या पार्श्वभूमीवर, गणेश विसर्जनासाठी पुणे महानगरपालिकेने जोरदार तयारी केली आहे. विसर्जन मिरवणूक रविवारी दुपारपर्यंत चालणार असून, गणेशभक्तांच्या सोयीसाठी शहरात विविध ठिकाणी विशेष व्यवस्था करण्यात आल्या आहेत.

महापालिकेने १५ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सार्वजनिक स्वच्छता, मिरवणूक मार्गांवर औषधोपचार व्यवस्था, निर्माल्य कलश, कीटकनाशक फवारणी, आणि विशेषतः विसर्जन घाटांवर अग्निशमन दल व जीवरक्षकांची नियुक्ती केली आहे. नदी, तलाव किंवा विहिरी नसलेल्या परिसरात विसर्जन हौद आणि लोखंडी टाक्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

याव्यतिरिक्त, विसर्जन स्थळांवर नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था, मांडव आणि ‘हिरकणी कक्ष’ (लहान मुलांसाठी) उभारण्यात आले आहेत. विद्युत आणि ध्वनिक्षेपक यंत्रणांचीही सोय करण्यात आली आहे. पालिकेने शहरातील प्रमुख रस्ते जसे की, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, लक्ष्मी रस्ता, आणि टिळक रस्ता सुस्थितीत केले आहेत.

जलप्रदूषण टाळण्यासाठी पालिकेने नागरिकांना नदीपात्राऐवजी हौदांमध्येच मूर्ती विसर्जन करण्याचे आवाहन केले आहे. यासाठी शहरात २७४ ठिकाणी निर्माल्य संकलन आणि २४१ ठिकाणी गणेश मूर्ती संकलन केंद्रांची व्यवस्था केली आहे.

नटेश्वर घाट आणि पांचाळेश्वर घाटावर मानाच्या गणपतींच्या विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. अग्निशमन दलाचे जवान आणि जीवरक्षक लाइफ जॅकेट आणि लाईफ बॉयसह सज्ज आहेत. आपत्कालीन परिस्थितीसाठी संपर्क क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे