पुणे गारठलं, थंडीचा कडाका वाढला

4

पुणे, ३० ऑक्टोंबर २०२२: परतीचा पाऊस थांबून एक आठवडा झाल्यानंतर लगेच पुण्यात थंडीचा कडाका वाढला आहे. पुणे शहरात शनिवारी रात्री किमान तापमान १२.६ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. उत्तर भारतात सुरू झालेली बर्फवृष्टी आणि राजस्थान मधून येणारे थंड वारे यामुळे पुण्यासह राज्यातील तापमानात घट होत आहे.

दरम्यान, दिवाळी नंतर थंडीला सुरुवात झाली असून येत्या काळात थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर महिन्याचा आढावा घेतल्यास १९६८ मध्ये पुणे शहरात तापमान ९.४ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले होते. त्यानंतर यावर्षी ऑक्टोबरच्या शेवटच्या दिवसांत १२.६ अंश सेल्सिअर तापमानाची नोंद झाली आहे.

राजस्थानमधून मोसमी वाऱ्यांनी २० सप्टेंबरला परतीच्या प्रवासाला सुरुवात केली असली तरी उत्तर भारतात मोठय़ा प्रमाणावर पाऊस होऊन परतीचा प्रवास लांबला. महाराष्ट्रातून १४ ऑक्टोबरला परतीचा प्रवास सुरू झाला. पण, त्यापूर्वी आणि त्यानंतरही राज्याच्या विविध भागाला पावसाने झोडपून काढले. अरबी समुद्रातून येणाऱ्या मोठ्या प्रमाणावरील बाष्पामुळे परतीच्या पावसाचा प्रवास लांबला.

पावसाच्या लांबलेल्या या प्रवासामुळे ढगाळ वातावरण राहून दिवसाचे कमाल तापमान राज्यभर संपूर्ण महिन्यात सरासरीच्या खालीच राहिले. त्यामुळे ‘ऑक्टोबर उष्णतेच्या कालावधीला यंदाही सुटी मिळाली आणि थंडी अवरतण्यासही उशीर झाला. ऑक्टोबरमध्ये मुंबई परिसर आणि कोकणात ३५ ते ३७ अंश सेल्सिअस, मध्य महाराष्ट्रात ३५ ते ३७ अंश सेल्सिअस, मराठवाडा आणि विदर्भात काही भागांत ३५ ते ३८ अंशांपर्यंत कमाल तापमान गेलेले अनेकदा दिसून आले आहे.

२०१९ मध्ये १६ ऑक्टोबरला महाराष्ट्र आणि देशातून मोसमी पाऊस माघारी गेला होता. मात्र, त्यानंतर सलग तीन वर्षे त्याचे परत फिरणे ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवडय़ातच होत आहे. २०२० मध्ये २८ ऑक्टोबर, २०२१ मध्ये २५ ऑक्टोबर, तर २०२२ मध्ये २३ ऑक्टोबरला मोसमी पाऊस देशातून माघारी गेला. त्यामुळे ऑक्टोबर अखेर पर्यंत पावसाळी स्थिती कायम राहून थंडीची चाहूल लागण्यासही उशीर झाला.

राज्यातील काही तापमाननोंद..

२८ ऑक्टोबरला तेथे १३.२, शनिवारी (२९ ऑक्टोबर) १२.९ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले. महाबळेश्वरचे किमान तापमान १३.२ अंश सेल्सिअस होते. त्यापाठोपाठ पुणे येथे १३.३, नाशिक १३. ६, जळगाव १४.६, सातारा १५.२, परभणी १५.५, नागपूर आणि सोलापूर १६.६, सांगली १७.१, कोल्हापूर १७.५, अकोला १८.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

शहरात हंगामातील नीचांकी १२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तापमानात घट होत असताना तापमानाचा हंगामातील नीचांकी कायम असल्याने रात्रीच्या गारव्यात वाढ झाली आहे. त्यामुळे अगदी गेल्याच आठवड्यात गारठा जास्त वाढला पण, पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार आठवडाभर थंडीची स्थिती कायम राहणार आहे. तर उष्णतेच्या तापमानात काही प्रमाणात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा