पुणे जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण जाहीर

पुणे: पुणे जिल्ह्यातील १३ पंचायत समिती सभापती पदाची आरक्षण सोडत आज जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेच्या शरदचंद्र पवार सभागृहात काढण्यात आलेल्या आरक्षण सोडत कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, तहसिलदार विकास भालेराव यांच्यासह सर्व तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राम यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद (अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती) आणि पंचायत समित्या (सभापती व उपसभापती) (पदांचे आरक्षण व निवडणुक) नियम १९६२ च्या २ (फ) च्या उपकलम (२ ते ६) मधील तरतुदीनुसार आरक्षण कार्यपध्दतीबाबत सविस्तर माहिती दिली.
सोडत पध्दतीने चिठ्ठया काढून बारामती, जुन्नर, खेड, इंदापूर या पंचायत समित्यांची नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी निवड झाली. त्यापैकी जुन्नर, खेड या दोन पंचायत तालुक्यांना मागील सन २०१७ च्या निवडणुकीमध्ये महिलांचे आरक्षण होते. त्यामुळे यावेळी त्यांना महिलांच्या आरक्षणातून वगळण्यात आले. त्यानंतर उर्वरीत बारामती व इंदापूर या दोन पंचायत समित्यांना सभापती पदासाठीचे आरक्षण नागरिकांच्या मागास प्रवर्ग माहिलांसाठी राखीव जाहीर करण्यात आले तसेच जुन्नर व खेड या पंचायत समित्या नागरीकांचा मागास प्रवर्गासाठी जाहीर करण्यात आल्या.
वेगवेगळया प्रवर्गासाठी यापूर्वीच आरक्षित झालेल्या पंचायत समित्या वगळता मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, पुरंदर, दौड, शिरुर या ७ पंचायत समित्या सर्वसाधारण सभापती पदासाठी शिल्लक राहिल्या असल्याचे जाहिर करण्यात आले. त्यापैकी मुळशी, भोर, वेल्हा या पंचायत समित्या सन २०१७ च्या सभापती पदासाठी महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने यावेळी पंचायत समिती मावळ, पुरंदर, शिरुर, दौंड सर्वसाधारण महिला प्रवर्ग सभापती पदासाठी व मुळशी भोर,वेल्हा या पंचायत समित्या सर्वसाधारण सभापती पदासाठी आरक्षित असल्याचे जाहीर करण्यात आले.
पंचायत समितीनिहाय सभापती आरक्षण- हवेली- अनुसूचित जाती महिला, आंबेगाव- अनुसूचित जमाती, बारामती-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, जुन्नर- नागरिकांचा मागास प्रवर्ग, इंदापूर- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, खेड- नागरिकांचा मागास प्रवर्ग, मावळ- सर्वसाधारण महिला, पुरंदर- सर्वसाधारण महिला, शिरुर- सर्वसाधारण महिला, दौंड- सर्वसाधारण महिला, मुळशी- सर्वसाधारण, भोर- सर्वसाधारण, वेल्हा- सर्वसाधारण.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा