पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खेड तालुक्यातील निर्मला पानसरे यांची तर उपाध्यक्षपदी भोर तालुक्यातील रणजित शिवतारे यांची बिनविरोध निवड झाली.
अध्यक्षपद सर्वसाधारण महिला राखीव असल्याने १८ महिला सदस्या इच्छुक होत्या. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या.
अजेंड्यानुसार जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या पहिल्या मजल्यावर सुरू न करता थेट पाचव्या मजल्यावर सुरू केली.
विरोधी पक्षातील महिला सदस्य अर्ज भरण्यापासून वंचित राहिल्या. यामुळे आमची फसवणूक झाल्याचा आरोप करत, महिला सदस्यांनी करत सभागृहाच्या बाहेर धरणे आंदोलन केलं. जिल्हा परिषद सदस्य आशा बुचके, जयश्री पोकळे आदी महिला सदस्याचा यात समावेश होता. मात्र, एक वाजून गेल्यावरही सभागृहाचे दारही उघडण्यात आले नव्हते.
दरम्यानच्या काळात राष्ट्रवादीकडून उमेदवाराची घोषणा केली गेली आणि प्रशासनाकडून पाचव्या मजल्यावर निवडणूक प्रक्रिया राबवली.