लोकअदालतीत गोंधळ शिगेला; पुण्याचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश स्वतः मैदानात उतरले!

पुणे लोकअदालतमध्ये शनिवारी अक्षरशः नाट्यमय वळण आलं. वाहतूक नियमभंगांवरील दंडासाठी आयोजित या लोकअदालतीत शुक्रवारपासून गोंधळ माजला होता. नागरिकांच्या असंतोषानं वातावरण तापलं होतं. अखेर परिस्थिती हाताळण्यासाठी थेट प्रमुख जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजन स्वतः मैदानात उतरले. त्यांनी नागरिकांना शांत करत सहकार्याची विनंती केली. “मनुष्यबळ कमी असल्याने थोडा वेळ लागत आहे, पण तुम्हाला पुन्हा पुन्हा पोलिस ठाण्यात किंवा न्यायालयात यायची गरज नाही” असं आश्वासन देत त्यांनी गर्दीवर नियंत्रण मिळवलं.

या लोकअदालतीत केवळ दोन दिवसांत तब्बल १ कोटी ८ लाखांचा दंड वसूल झाला आहे. पुढे ऑनलाइन दंड भरण्याची सुविधा सुरू करण्याची शक्यताही महाजन यांनी व्यक्त केली. जिल्हा विधि सेवा प्राधिकरण आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्तपणे ही लोकअदालत आयोजित केली होती. न्यायाधीशांच्या थेट हस्तक्षेपामुळे गोंधळ आटोक्यात आला आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.

न्यूज अनकट प्रतिनिधी चैतन्य पगारे