पुणे-लोणावळा मार्गासाठी तिसरी आणि चौथी मार्गिका; रेल्वेमंत्र्यांकडून लवकर मंजुरीची मागणी

पुणे-लोणावळा मार्गासाठी तिसरी आणि चौथी मार्गिका हा विषय सध्या अत्यंत महत्त्वाचा बनला आहे. या दोन मार्गिकांसाठी लागणारा खर्च राज्य सरकारकडून उचलण्याचा निर्णय झाला असून, आता हा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गिकांना लवकरात लवकर मंजुरी मिळावी, अशी मागणी खासदार आणि केंद्रीय विमान व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी रेल्वेमंत्र्यांना केली आहे.

मोहोळ यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची पुण्यातील रेल्वेच्या विविध प्रश्नांबाबत भेट घेतली होती. या बैठकीत पुणे-लोणावळा मार्गावरील तिसरी आणि चौथी मार्गिका, पुणे रेल्वे स्थानकाचं आधुनिकीकरण, तसेच नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणारी समर्पित रेल्वे सेवा सुरू करण्यासंबंधी चर्चा करण्यात आली.

पुण्यातील रेल्वे विभागातील अनेक प्रकल्प सध्या प्रगतिपथावर असून काम वेगाने सुरू आहे. मात्र, अनेक वर्षांपासून पुणे-लोणावळा मार्गावरील तिसरी आणि चौथी मार्गिका हा प्रश्न प्रलंबित होता. नुकत्याच राज्य सरकारने या मार्गिकांचा ५० टक्के खर्च उचलण्यास संमती दिली असून, त्यासंबंधी सहमतीही दर्शवली आहे.

याशिवाय, सेमी हायस्पीड असलेल्या पुणे-नाशिक मार्गाचा सुधारित आणि सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात आला आहे. तसेच, पुणे-अहिल्यानगर मार्गाचा डीपीआर तयार असून, पुणे रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणाचं कामही सुरू आहे. या प्रकल्पांचा वेगवान विकास करण्यासाठी रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली आहे.

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं की, पुणे-लोणावळा मार्गावरील तिसरी आणि चौथी मार्गिका अत्यंत आवश्यक आहे. राज्य सरकारने या मार्गिकांचा खर्च उचलण्यास संमती दिल्यानंतर आता मंत्रिमंडळाची मंजूरी घेणे गरजेचे आहे. रेल्वेमंत्र्यांनी लवकर निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं असून, पुणे रेल्वे स्थानकाच्या विकासासाठीही चर्चा झाली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी ध्रुव पाटील