पुणे-सोलापूर महामार्गावरील लोणीकाळभोर परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. ऑर्डर रद्द केल्याच्या रागातून तिघा युवकांनी एका झोमॅटो डिलिव्हरी कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करून त्याच्याकडील रोख आणि साहित्य लुटले. या प्रकरणात लोणीकाळभोर पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे.
तक्रारदार स्वप्नील काले हे झोमॅटो डिलिव्हरी कर्मचारी असून, त्यांनी लोणीकाळभोर पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली होती. त्यांच्या तक्रारीवरून स्वप्नील बंगले, रोहन लोढे आणि अजित चांदणे या तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपींनी ऑर्डर दिली होती; मात्र काही कारणामुळे ती रद्द करण्यात आली. याचाच राग काढत आरोपींनी तक्रारदारावर हल्ला चढवला. आरोपींनी तक्रारदाराला मारहाण करत त्याच्याकडील पैसे आणि इतर वस्तू हिसकावून घेतल्या.
घटनेची माहिती मिळताच लोणीकाळभोर पोलिसांनी तातडीने छापा टाकत तिन्ही आरोपींना अटक केली. सध्या आरोपींविरुद्ध लूटमार, मारहाण आणि इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे डिलिव्हरी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, संबंधित कंपन्यांनी सुरक्षेबाबत ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी साक्षी पांचाळ












































