व्होट बँकसाठी इच्छुक ताई, दादांचा देवदर्शन सहल फंडा

निवडणुकीची तयारी जोरात! ‘ताई-दादा’ आता व्होट बँकसाठी देवदर्शनाला.

पुणे महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्यामुळे सर्व पक्षांतील इच्छुक उमेदवार आता जोमाने तयारीला लागले आहेत. स्वतःची व्होट बँक मजबूत करण्यासाठी आणि मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक इच्छुकांनी आता ‘देवदर्शन सहल फंडा’ अवलंबला आहे. नवरात्रोत्सव जवळ आल्याने, कोल्हापूरची महालक्ष्मी देवी, उज्जैन यात्रा आणि इतर धार्मिक स्थळांच्या मोफत सहलींचे आयोजन केले जात आहे.

या सहलींसाठी बस आणि रेल्वेची खास सोय करण्यात आली आहे. फक्त धार्मिक सहलीच नव्हे, तर मतदारांना आकर्षित करण्यासाठी इतर अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये आधार कार्ड केंद्र, विविध शासकीय दाखले मोफत देणे अशा सेवांचा समावेश आहे. काही इच्छुकांनी त्यांचे प्रभाग बदलले गेल्यामुळे नवीन भागांमध्ये आपला प्रभाव वाढवण्यास सुरुवात केली आहे.

या सर्व घडामोडी आगामी निवडणुका किती तीव्र असतील याचे संकेत देत आहेत. राजकीय पक्षांनीही आपली रणनीती आखायला सुरुवात केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुरू केलेला “राष्ट्रवादी परिवार मिलन” हा उपक्रम याच प्रयत्नांचा एक भाग आहे, ज्यामध्ये ते थेट कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन भेटीगाठी घेत आहेत. पुणे महापालिका निवडणुकीसाठी ३ ते ६ ऑक्टोबरदरम्यान अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार असून, त्यानंतर प्रचाराला आणखी वेग येईल. या सर्व घडामोडींमुळे पुणे शहरातील राजकीय वातावरण सध्या तापले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे