पुणेकरांचा प्रभाग रचनेत रस नाही! ५,९२२ हरकतींवर फक्त ८२८ हजर; राजकीय डावपेचांची चर्चा रंगली

पुणे महापालिका निवडणुकीसाठी आखलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर दाखल झालेल्या तब्बल ५,९२२ हरकतींमध्ये केवळ ८२८ हरकतदारच सुनावणीला हजर झाले. इतक्या मोठ्या संख्येने अर्ज दाखल होऊनही एवढा अल्प प्रतिसाद मिळाल्याने, या संपूर्ण प्रक्रियेमागे राजकीय डावपेच असल्याच्या चर्चा शहरात रंगल्या आहेत.

सर्वाधिक हरकतींचा पाऊस पडलेल्या प्रभाग क्रमांक ३४ (नन्हे-वडगाव बुद्रुक) मध्ये फक्त ७७ तर प्रभाग क्रमांक २४ (कमला नेहरू हॉस्पिटल-रास्ता पेठ) येथे फक्त ८५ हरकतदार उपस्थित राहिले. म्हणजे कागदावर विरोध मोठा दिसला, पण मैदानात कुणीच उभं राहिलं नाही!

आता या हरकतींचा अहवाल १५ सप्टेंबरपर्यंत शासनाला सादर होणार आहे. त्यानंतर अंतिम प्रभाग रचना ३ ते ६ ऑक्टोबर दरम्यान जाहीर होण्याची शक्यता आहे. पण अल्प प्रतिसादामुळे, “हरकती फक्त राजकीय दबाव निर्माण करण्यासाठी होत्या का?” असा प्रश्न राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेत आला आहे.

पुण्याच्या पुढील महापालिका निवडणुकीचे राजकीय समीकरण या प्रभाग रचनेवर अवलंबून आहे. त्यामुळे, आता राजकीय नेत्यांचे पत्ते उघड होण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी चैतन्य पगारे