शहराच्या वाहतूक व्यवस्थेला नवा श्वास देणारा मेट्रो प्रकल्प आता अधिकच चर्चेत आला आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी थेट आक्रमक भूमिका घेतली आणि भोसरीतील सध्याचा उड्डाणपूल जर मेट्रो मार्गात अडथळा ठरत असेल, तर “तो पाडून टाका” अशी मागणी सरळसरळ केली.
फुगेवाडी येथील मेट्रो कार्यालयात झालेल्या या बैठकीत विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, उमा खापरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. निगडी ते चाकण मेट्रो मार्ग नाशिक फाटा-भोसरी मार्गे करण्याचा ठराविक आग्रह लोकप्रतिनिधींनी व्यक्त केला. त्याचबरोबर, गोडाऊन चौक ते चाकण या रचनेप्रमाणेच नाशिक फाटा ते चाकणपर्यंत एकसारखीच योजना असावी, अशीही मागणी झाली.
वाकडमधील भुजबळ चौकात दोन्ही मेट्रो मार्गांची जोडणी प्रवाशांना सोयीस्कर होईल याकडे विशेष लक्ष देण्याची सूचना करण्यात आली. तसेच, मेट्रो स्टेशनजवळ पुरेशा पार्किंगची सोय असावी, अशीही मागणी करण्यात आली. भक्ती-शक्ती ते चाकण या प्रस्तावित मार्गावर नाशिक फाटा, गवळी माथा चौक, भोसरी डिस्ट्रिक्ट सेंटर, गोडाऊन चौक, चाकण या महत्त्वाच्या ठिकाणी विशेष लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीनंतर महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी येत्या आठ दिवसांत मार्गाचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे आश्वासन दिले. महापालिका आयुक्त शेखर सिंह, एनएचआयचे प्रकल्प संचालक संजय कदम यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
लोकप्रतिनिधींच्या या ठाम भूमिकेमुळे मेट्रो मार्गाच्या अंतिम रचनेला वेग मिळण्याची शक्यता आहे. वाढत्या शहराला दिलासा देण्यासाठी हा निर्णय वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे












































