यंदाच्या गणेशोत्सवात पुणे मेट्रोला मोठा प्रतिसाद मिळाला असून, केवळ पिंपरी-चिंचवड परिसरातून तब्बल १ कोटी ३४ लाख ९२ हजार रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळाले आहे. या काळात पिंपरी-चिंचवडमधील स्थानकांवरून ६ लाख ९१ हजार ५८३ प्रवाशांनी प्रवास केला, ही गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठी वाढ आहे. मेट्रोने रात्री उशिरापर्यंत सेवा सुरू ठेवल्याने लाखो गणेशभक्तांना याचा मोठा फायदा झाला.
यंदाच्या गणेशोत्सवात २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीत पुणे मेट्रोने दोन्ही मार्गांवर एकूण ३७.१६ लाख प्रवाशांना सेवा दिली आणि ५.६७ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले. वाढलेली प्रवासी संख्या आणि उत्पन्न हे मेट्रोच्या विस्तारित सेवा आणि विशेषतः उत्सवकाळातील नियोजनामुळे शक्य झाले. पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर मेट्रोमुळे भाविकांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळाला. ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या काळात मेट्रो रात्री २ वाजेपर्यंत धावली, तर अनंत चतुर्दशीला तर सलग ४१ तास मेट्रो सेवा सुरू होती, ज्यामुळे रात्री उशिरापर्यंत दर्शन घेऊन भाविकांना घरी परतणे सोपे झाले.
महामेट्रोचे अतिरिक्त महासंचालक चंद्रशेखर तांबवेकर यांनी सांगितले की, गणेशोत्सवात मेट्रोला मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रवासी संख्येत ३०० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. या वाढत्या गर्दीला हाताळण्यासाठी मेट्रो प्रशासनाने अतिरिक्त फेऱ्या, सुरक्षा व्यवस्था आणि स्टेशनवर सुविधा वाढवल्या होत्या. रात्रीच्या वेळी प्रवाशांच्या सोयीसाठी पीएमपी बससेवा आणि ऑटोरिक्षा थांब्यांशीही समन्वय साधण्यात आला होता.
याचाच परिणाम म्हणून, मेट्रोने वाहतूक कोंडीचा त्रास टाळून कमी वेळेत इच्छितस्थळी पोहोचण्याचा सोयीस्कर पर्याय दिला आहे, त्यामुळे उत्सव काळात प्रवासासाठी मेट्रोला अधिक पसंती मिळत असल्याचे दिसून आले.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे












































