‘मेट्रो’ रक्षकांचे थकीत वेतन दिवाळीपूर्वी मिळणार मंडळाची कठोर भूमिका!

पुणे मेट्रोमध्ये कार्यरत असलेल्या सुमारे ४० हून अधिक सुरक्षा रक्षकांचे गेल्या दोन ते चार महिन्यांचे वेतन थकले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वॉरियर सिक्युरिटी अँड मॅन पॉवर सर्व्हिसेस आणि अनंता स्काय इन्फ्राटेक या खासगी सुरक्षा पुरवठादार कंपन्यांनी हे वेतन थकवले आहे. कामगारांना घरभाडे आणि दैनंदिन खर्च भागवणेही कठीण झाले असून, दिवाळीच्या तोंडावर आर्थिक संकटाचा सामना करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

या सुरक्षा रक्षकांनी थेट कामगार उपायुक्तांसह पुणे जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. वेतन विचारले असता ठेकेदार धमकीच्या सुरात बोलतात, अशी गंभीर तक्रारही सुरक्षा रक्षकांनी केली आहे. ‘दररोज १२ तास काम करूनही तीन महिन्यांपासून वेतन नाही, साप्ताहिक सुटी नाही आणि दिवाळी बोनसही मिळालेला नाही,’ अशी व्यथा वाकड येथील सुरक्षा रक्षक विजय सांगळे यांनी मांडली.

या प्रकरणाची पुणे जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाने गंभीर दखल घेतली आहे. मंडळाचे सचिव प्रशांत वंजारी यांनी, ‘सुरक्षा रक्षकांना थकीत वेतनासह दिवाळी बोनस देण्याच्या सूचना संबंधित ठेकेदार संस्थेला देण्यात येतील आणि त्यानंतरही वेतन न दिल्यास योग्य ती कारवाई केली जाईल,’ असे स्पष्ट केले आहे. बहुजन कर्मचारी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत कांबळे यांनी, ‘वेतन न देणे ही कामगारांच्या हक्कांची पायमल्ली असून, प्रशासनाने थकीत वेतन आणि बोनस मिळवून द्यावा,’ अशी मागणी केली आहे.

दरम्यान, मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी, ‘संबंधित ठेकेदारांना सूचना दिल्या असून, दिवाळीपूर्वी सुरक्षा रक्षकांना त्यांचे थकीत वेतन मिळेल,’ असे आश्वासन दिले आहे. मात्र, संबंधित ठेकेदार कंपन्यांकडून स्पष्टीकरण मागविण्याची प्रक्रिया सुरू केली असता, त्यांच्या अधिकाऱ्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, अशी माहिती आहे. दिवाळीपूर्वी सुरक्षा रक्षकांना न्याय मिळतो का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे