वाहनतळांसाठी पुणे मेट्रोनेच जागा शोधाव्यात, महापालिका आयुक्तांच्या सुचना

3

पुणे, ३१ ऑगस्ट २०२३ : मेट्रो स्टेशनच्या परिसरात मेट्रो प्रवाशांना वाहन पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी वाहनतळांची व्यवस्था असणे गरजेचे आहे. त्यामुळे महामेट्रोने अशा जागा शोधाव्यात आणि आम्हाला यादी द्यावी, आम्ही त्यावर आरक्षण टाकून त्या मेट्रोला देऊ, अशी सूचना महामेट्रोला केल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली. पुणे आणि पीएमआरडीए मेट्रो आणि एचसीएमटीआर या प्रकल्पांवर चर्चा करण्यासाठी मुंबईत मुख्यमंत्री वाॅर रुममध्ये बैठक झाली. या बैठकीविषयी माहिती देताना विक्रम कुमार म्हणाले की, मेट्रोला महापालिकेच्या हिश्श्यापोटी ४० कोटी देण्यात आले आहेत.

उर्वरीत १५० कोटी डिसेंबरपर्यंत टप्प्याटप्प्याने देण्यात येणार आहेत. सध्या शिवाजीनगर आणि दिवाणी न्यायालय याठिकाणी प्रवाशांना वाहनतळांची व्यवस्था आहे. मात्र अन्य ठिकाणी मेट्रो स्टेशनला वाहनतळांची व्यवस्था करण्यासाठी बैठकीमध्ये चर्चा झाली. त्यानुसार १०० ते १५० मीटर परिसरातील महापालिकेच्या जागा मेट्रोला वाहनतळांसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पीएमआरडी मेट्रोसाठी गणेशखिंड रस्त्यांचे तातडीने भूसंपादन करण्यात येणार आहे. यासाठी महापालिका प्रक्रिया राबवणार आहे. यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला साडेचार मीटर भूसंपादन करण्यात येणार आहे. जागा मालकांची संमती मिळाल्यानंतर याठिकाणी ज्यांच्या सीमाभिंत काढण्यात येत आहे. यासाठी येणारा खर्च महापालिका आणि पीएमआरडी कडून करण्यात येणार असल्याचे विक्रम कुमार यांनी सांगितले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा