पुणे- सातारा जिल्हा हद्दीला गृहराज्यमंत्र्यांची अचानक भेट

सातारा,दि २५ एप्रिल २०२० : सातारा जिल्हयामध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होवू नये, याकरीता जिल्हयाच्या सर्व हद्दी नाकाबंदी करण्यात आल्या आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व वाहनांना जिल्हयामध्ये प्रतिबंध घालण्यात आले आहे.

पुणे- सातारा हायवेवर सातारा जिल्हयाची हद्द असणाऱ्या सारोळा पुलाजवळ संचारबंदी काळात करण्यात आलेल्या तपासणी ठिकाणाला राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी आज सकाळी अचानक भेट दिली.
यावेळी त्यांनी या ठिकाणाची व बंदोबस्ताची आणि कार्यरत असणाऱ्या पोलीस यंत्रणेची पोलीस विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या समवेत पाहणी केली. तपासणी ठिकाणावर पोलीस यंत्रणा अलर्ट असल्याचा शेराही देत पोलीस अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी आरोग्याची काळजी घ्यावी , असा सल्लाही त्यांनी दिला.

पुणे, मुंबई येथून कोणी कोरोना बाधित रुग्ण सातारा जिल्हयामध्ये येवू नये, याकरीता जिल्हा प्रशासन व सातारा जिल्हा पोलीस यंत्रणा यांनी काळजी घेवून सातारा जिल्ह्याला  जोडणाऱ्या सर्व हद्दी या नाकाबंदी करण्यात आल्या आहेत.
पुण्याकडून साता-याला येणारा महत्वाचा ” पुणे – सातारा हायवे ” आहे. या हायवेवर जिल्हयाच्या हद्दीवर सारोळा पुलाजवळ सातारा पोलीस यंत्रणेकडून तपासणी ठिकाण (चेकपोस्ट) करण्यात आले आहे.

यावेळी या तपासणी ठिकाणाची पहाणी करण्याकरीता राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे याठिकाणी आले होते. त्यावेळी त्यांचेसोबत फलटण,खंडाळा, शिरवळ येथील पोलीस विभागाचे वरीष्ठ अधिकारी त्याचबरोबर सातारा जिल्हा परीषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील हे ही उपस्थित होते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा