पुणे महापालिकेची लोकअदालत यशस्वी ५ कोटींची थकबाकी वसूल

पुणे महापालिकेने थकीत पाणीपट्टी आणि मालमत्ता कराची वसुली करण्यासाठी आयोजित केलेली राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी ठरली आहे. या एकाच लोकअदालतीतून महापालिकेने तब्बल ५ कोटींहून अधिक रुपयांची थकबाकी वसूल केली आहे. राष्ट्रीय आणि राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्गदर्शनाखाली ही लोकअदालत पार पडली, ज्यात हजारो प्रकरणे निकाली काढण्यात आली.

महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने थकबाकीदारांना ऑनलाइन नोटिसा पाठवून या लोकअदालतीत सहभागी होण्याचे आवाहन केले होते. याचे सकारात्मक परिणाम दिसून आले. यामध्ये पाणीपट्टी आणि मालमत्ता कराशी संबंधित एकूण ३,४२४ प्रकरणे निकाली निघाली आणि ५ कोटी १४ लाख १६० रुपयांचा महसूल महापालिकेला मिळाला.

यामध्ये २,४८१ पाणीपट्टी थकबाकीदारांकडून ३ कोटी १४ लाख १९ हजार रुपये वसूल करण्यात आले, तर ९४३ मालमत्ता कर थकबाकीदारांकडून २ कोटी २ हजार रुपयांचा कर जमा झाला. विशेष म्हणजे, ८३४ मालमत्ताधारकांनी ऑनलाइन कर भरून ४ टक्के सवलतीचा लाभ घेतला. यामुळे नागरिकांना सोयीस्कर पद्धतीने थकबाकी भरता आली.

अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी या यशाबद्दल समाधान व्यक्त केले असून, यापुढेही अशा प्रभावी मोहिमा राबवल्या जाणार असल्याचे सांगितले आहे. थकबाकीदारांना वारंवार संधी देऊनही प्रतिसाद न मिळाल्यास मालमत्ता जप्तीची कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे