PMC Budget 2025 -26 : पुणे महापालिकेने २०२५–२६ या आर्थिक वर्षासाठी १२ हजार ६१८.०९ कोटी रुपयांचे अर्थसंकल्प सादर केला आहे. महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर समित्या स्थापन करण्यात येणार असून, आरोग्य अभियानावर विशेष भर दिला जाणार आहे.
महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी बांधलेल्या वसाहतींच्या पुनर्विकासावर लक्ष केंद्रित केले जाईल. शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून, विकासकामांची जबाबदारी केवळ एका विभागावर न ठेवता, ती विविध विभागांमध्ये विभागली जाईल. यामध्ये रस्ते, वीज, पाणीपुरवठा, मलनिस्सारण आणि शाळा यांचा समावेश असेल.
नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी स्वतंत्र विभाग आणि सुसज्ज प्रयोगशाळा स्थापन केल्या जातील. शहरातील स्मशानभूमींचा विकास आणि महापालिकेच्या मालकीच्या जागांचा योग्य वापर करून उत्पन्न वाढवण्याचा मानस आहे.
हिंजवडी येथील सर्वे नंबर १९ मधील इमारतींचे क्लस्टर :
डेव्हलपमेंट अंतर्गत पुनर्वसन करण्याचे नियोजन आहे, ज्यामुळे येथील नागरिकांची पुराची समस्या कायमस्वरूपी दूर होईल. रस्त्यांच्या भूसंपादनासाठी प्रथमच २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त निधीची तरतूद करण्यात आली आहे, ज्यामुळे शहरातील रस्ते विकास वेगाने होईल. समाविष्ट गावांच्या विकासासाठी १२४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
शहरातील मंडईंचे नूतनीकरण, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण केंद्र, महिला बचत गटांसाठी सुपर स्टोअर्स यांसारख्या विविध योजनांचा अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला आहे. शिक्षण विभागासाठी ९०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, ज्यामध्ये अभिनव शाळा, सिस्टर स्कूल आणि सीसीटीव्ही बसवण्याचा समावेश आहे. शिक्षकांच्या वेतनासाठी १३९ कोटी रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत.
महापालिकेच्या मालकीच्या जागांचा योग्य वापर करून उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल. शहरात ११ ठिकाणी एसटीपी प्रकल्प, ५५ किलोमीटर मलनिस्सारण वाहिन्या आणि जनजागृती कार्यक्रमांसाठी ५४० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी स्पष्ट केले की, हा अर्थसंकल्प पुणे शहराच्या विकासाला नवी दिशा देणारा ठरेल आणि नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे