अखेर तो क्षण आलाच! राज्य निवडणूक आयोगाने पुणे जिल्ह्यातील १४ नगरपरिषदा आणि ३ नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर करताच, काल मंगळवार (दि. ४) पासून जिल्ह्यात तत्काळ आचारसंहिता लागू झाली आहे. ‘लोकशाहीचा उत्सव’ म्हणून पाहिल्या जाणाऱ्या या निवडणुकीत तब्बल ६ लाख ३४ हजार मतदार आपला हक्क बजावणार असून, ते ३९८ नगरसेवकांचे भवितव्य निश्चित करतील.
यासोबतच, थेट मतदानातून अध्यक्षपदाची निवड होणार असल्याने या निवडणुकीला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
या निवडणुकीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. जिल्ह्यातील १४ नगरपरिषदांसाठी ५ लाख ७९ हजार १९९ आणि तीन नगरपंचायतींसाठी ५५ हजार ७४१ मतदार असणार आहेत. या मतदानासाठी प्रशासनाने एकूण ७३० मतदान केंद्रे सज्ज ठेवली आहेत, ज्यात ६६० केंद्रांचा समावेश नगरपरिषदांसाठी, तर ७० केंद्रांचा समावेश नगरपंचायतींसाठी आहे.
मतदानाचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी ८१० मतदान केंद्राध्यक्ष आणि ३ हजार २४० मतदान अधिकारी कार्यरत असतील. प्रशासनाने ८११ कंट्रोल युनिट्स आणि १६२२ मतदान यंत्रे (EVMs) उपलब्ध केली आहेत.
विशेष म्हणजे, या निवडणुकीत प्रभाग रचना विविध पद्धतीने केली गेली आहे. बारामतीसह ५ नगरपरिषदांमध्ये प्रत्येकी एका प्रभागात तीन सदस्य पद्धतीने, तर उर्वरित ९ ठिकाणी दोन सदस्य पद्धतीने निवडणुका होणार आहेत.
नवीन वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या फुरसुंगी उरळी देवाची नगरपरिषद, तसेच मंचर आणि माळेगाव नगरपंचायतीसाठी ही पहिलीच निवडणूक असल्याने या भागातील मतदारांमध्ये विशेष उत्साह आहे. दुबार आणि तिबार मतदारांना एकाच ठिकाणी मतदानाची संधी उपलब्ध करून दिली जाईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे













































