पुणे महापालिकेच्या रस्त्यांच्या दुरवस्थेवरून वाद पेटला असून, पथ विभागप्रमुख अनिरुद्ध पावसकर यांच्या भूमिकेवर माजी नगरसेवकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. महापालिकेने २०१३ मध्ये तीनशे कोटी रुपये खर्चून तयार केलेल्या रस्त्यांचे दोषदायित्व (Defect Liability) अवघ्या दोन वर्षांत संपले, कारण हे रस्ते वारंवार खोदले गेले. मात्र, यावर बोलताना खातेप्रमुख पावसकर यांनी “खोदाई झाल्यामुळे रस्त्याचे दोषदायित्व ठेकेदारांवर राहत नाही,” असे विधान केले.
पावसकर यांच्या या विधानावर माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर, प्रशांत बधे आणि सुहास कुलकर्णी यांनी संताप व्यक्त केला आहे. “खातेप्रमुखांनी महापालिकेची आणि नागरिकांची बाजू मांडणे अपेक्षित असताना, ते कंत्राटदारांची बाजू का मांडत आहेत?” असा संतप्त सवाल केसकर यांनी उपस्थित केला आहे. खातेप्रमुख जेव्हा अशाप्रकारे ठेकेदारांना वाचवतात, तेव्हा वाईट वाटते, असेही ते म्हणाले.
रस्त्यांच्या दुरवस्थेकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी माजी नगरसेवकांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे. नवीन रस्ता तयार करण्यापूर्वी त्या रस्त्यावर इतर खात्यांचे (उदा. जलवाहिन्या, वीज केबल्स) काही प्रस्ताव आहेत का, याची विचारणा संबंधित खातेप्रमुखांकडे करणे आवश्यक असते. आयुक्तांनी ही प्रक्रिया काटेकोरपणे पाळणे गरजेचे आहे. ठेकेदारांना दोषदायित्वातून सूट देण्याच्या या भूमिकेची सखोल चौकशी व्हावी आणि रस्ते खोदणाऱ्या संबंधित खात्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे













































