गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे गैरव्यवहार थांबवण्यासाठी पुणे महापालिका सरसावली निविदा समिती स्थापन करणार!

गैरव्यवहार थांबवण्यासाठी पुणे महापालिका सरसावली निविदा समिती स्थापन करणार!

पुणे महानगरपालिकेच्या कामांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. महापालिका लवकरच एक निविदा समिती स्थापन करणार असून, ही समिती निविदा प्रक्रियेतील सर्व अटी-शर्ती आणि कामांवर लक्ष ठेवणार आहे. पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी ही माहिती दिली आहे.

गेल्या काही वर्षांपासून महापालिकेच्या निविदा प्रक्रियेवर अनेकदा गैरव्यवहारांचे आरोप होत होते. ठराविक ठेकेदारांना डोळ्यासमोर ठेवून अटी-शर्ती ठरवणे, ठेकेदारांची ‘रिंग’ होणे, आणि त्यामुळे प्रशासनाला पुन्हा निविदा काढाव्या लागणे असे प्रकार वारंवार घडत होते. आता ही नवीन समिती या सर्व प्रकारांना आळा घालणार आहे.

सध्या कोणत्याही कामाचा आराखडा तयार झाल्यावर तो स्थायी समितीसमोर सादर करण्यापूर्वी पूर्वगणनपत्रक समितीमध्ये ठेवला जातो. त्यानंतर स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेची मंजुरी मिळाल्यावरच निविदा प्रक्रिया सुरू होते. या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता आणणे, कामाची गती वाढवणे आणि गैरप्रकार टाळणे हे निविदा समितीचे मुख्य उद्दिष्ट असणार आहे. या समितीमध्ये मुख्य लेखापालांसह इतर वरिष्ठ अधिकारी असतील. या निर्णयामुळे महापालिकेच्या कामकाजात सुधारणा होईल आणि सार्वजनिक पैशांचा योग्य वापर होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे

error: Content is protected !!
Exit mobile version