पुणे प्रभाग रचनेवर हरकतींचा पाऊस, तरीही ८ प्रभाग हरकतीमुक्त!

पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीची प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्यापासूनच त्यावर वाद सुरू आहेत. भाजपने ही रचना आपल्या सोयीनुसार केल्याचा आरोप होत आहे. याच पार्श्वभूमीवर, प्रभाग रचनेवर तब्बल १,३८२ हरकती आणि सूचना दाखल झाल्या आहेत. विशेष म्हणजे, यातील ७८५ हरकती एकाच दिवसात दाखल झाल्या आहेत, ज्यामुळे नागरिकांमधील तीव्र असंतोष दिसून येतो.

मात्र, या हरकतींच्या वादळातही ८ प्रभाग असे आहेत, जिथे एकही हरकत दाखल झाली नाही, यात कल्याणीनगर, वडगावशेरी, बावधन, शिवाजीनगर, शनिवारपेठ, डेक्कन जिमखाना, कर्वेनगर, कोथरूड आणि कोंढवा या भागांचा समावेश आहे. दुसरीकडे, विमाननगर-लोहगाव (३८१), नऱ्हे-वडगाव बुद्रुक (२७८), आणि मांजरी-साडेसतरा नळी (२२४) या प्रभागांमध्ये सर्वाधिक हरकती आल्या आहेत. हरकती नोंदवण्यासाठी केवळ दोन दिवसांची मुदत शिल्लक असल्याने पुढील काळात ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी चैतन्य पगारे