पुणे : विजयदिनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भिमा जवळील पेरणेफाटा येथील विजय रणस्तंभास अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुणे – नगर महामार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातून तसेच नगररोडवरून अहमदनगरला जाणाऱ्या वाहतुकीत मंगळवारी (दि.३१) रात्रीपासून बदल करण्यात येणार आहे.
पुणे-अहमदनगर मार्गावरील पेरणे फाटा येथे गर्दीमुळे वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी पुणे शहरातून व पिंपरी-चिंचवड शहराकडून नगररोडवरून अहमदनगरकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांनी नगररोडवरील खराडी बायपास चौक येथून उजवीकडे वळून हडपसर-सोलापूर रोड-केडगाव-चौफुला मार्गे न्हावरा शिरुर नगररोडवरून अहमदनगरकडे जावे. किंवा येरवडा – विश्रांतवाडी- आळंदी- मरकळ मार्गे शेल पिंपळगाव-शिक्रापूर-नगररोडला जावे.
सासवड, कात्रज बायपास रोडकडून येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांनी हडपसर गाडीतळ पुलाखालून उजवीकडे वळून सोलापूर रोडने मांजरी फाटा-१५ नंबर लक्ष्मी कॉलनी चौक पुणे येथून व सातारा रोडवरून येणाऱ्या वाहनांना हडपसर येथून सोलापूर महामार्गावरून चौफुला मार्गे न्हावरा शिरूर नगररोडवरून अहमदनगरकडे वळवण्यात आली आहे.