Pune Nashik Highway Traffic Jam: पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मोशी टोल नाका ते जय गणेश साम्राज्य चौकापर्यंत वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. संध्याकाळच्या वेळी वाहनांच्या लांबलचक रांगांमुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. चिखली, मोशी, देहू भागांत अवजड वाहने सुसाट वेगाने धावत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.
दोन किलोमीटरपर्यंत रांगा;
मोशी टोलनाक्यापासून जय गणेश साम्राज्य चौकापर्यंत संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागत आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे. देहूकडून आळंदीकडे जाण्यासाठी भारतमाता चौकात मोठी वाहतूककोंडी होत आहे.
अवजड वाहनांचा सुसाट वेग;
चिखली, मोशी, देहू, आळंदी, डुडुळगाव, भोसरी, चाकण, देहू फाटा या भागात अवजड वाहनांचे चालक भरधाव वेगाने गाडी चालवत आहेत. त्यामुळे शहरात अपघाताच्या घटना वाढू लागल्या आहेत.
प्रवाशांचा संताप;
“कोंडीमुळे रोजच कामावर जायला उशीर होतो. वेळेवर घरी पोहोचेल की नाही याची खात्री नाही. वाहतूक कोंडीमुळे प्रचंड चिडचिड होते आणि मानसिक त्रासही होतो,” असे एमआयडीसी (MIDC) कामगार रोशन निळे यांनी सांगितले.
पोलिसांची कारवाई:
“बेशिस्त वाहनचालकांवर कठोर कारवाई केली जाईल. २५ तारखेपासून जय गणेश साम्राज्य चौक ते अलंकापूरम मार्गावर एकेरी वाहतूक वळवण्यात येणार आहे,” असे भोसरी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक साळुंखे यांनी सांगितले.
मागण्या;
- या परिसरात अवजड वाहनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
- पोलिसांनी बेशिस्त वाहनचालकांवर कठोर कारवाई करावी.
- वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात.
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे