पुणे- नाशिक रेल्वे मार्गाला केंद्र सरकारची मान्यता

पुणे, दि.५जून २०२०: राज्याच्या सुवर्ण त्रिकोणात असणाऱ्या नाशिक – पुणे लोहमार्गाला अखेर केंद्र शासनाच्या रेल्वे मंत्रालयाची मंजुरी मिळाली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकल्प सुरू व्हावा, यासाठी नाशिककर वाट बघत होते. पुणे- नाशिक या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या रेल्वेमार्गाच्या कामास मध्य रेल्वे प्रशासन बोर्डा पाठोपाठ आता केंद्र सरकारने ही मान्यता दिली आहे.

दोन वर्षांपूर्वी पुणे आणि नाशिकच्या खासदारांनी संसदेत या प्रश्‍नी आवाज उठवत हे काम पूर्ण होण्याची मागणी केली होती. यानंतर या मार्गाच्या सर्वेक्षणासाठी दोनशे कोटी रुपये रेल्वे अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आले होते.

याबाबत मुंबईतील मध्य रेल्वे बोर्डाच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली होती. काही अटी-शर्ती च्या आधारावर या प्रस्तावाला तत्त्वत मान्यता देण्यात आली होती. या प्रस्तावित मार्गासाठी १६ हजार कोटी रुपयांचा खर्च येणार असून राज्य आणि केंद्र सरकार प्रत्येकी २० टक्के तर ६० टक्के निधी दोघांकडून सारख्या प्रमाणात उपलब्ध केला जाणार आहे.

या नव्या रेल्वे मार्गामुळे औद्योगिक, शेतकरी, विद्यार्थी या वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे. सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे हा प्रश्न निकाली लागत असून लवकरच या मार्गाचे काम सुरू होण्याची अपेक्षा खासदारांनी व्यक्त केली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा