पुण्यात एका २४ वर्षीय परिचारिकेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना धनकवडी येथील भारती विद्यापीठ रुग्णालय परिचारिका वसतिगृहात घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नर्सिंग क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
मृत तरुणीचे नाव वैशाली त्रिभुवन (वय २४, मूळ राहणार श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर) असे आहे. वैशालीने गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले. तिचे वडील जिजा अण्णा त्रिभुवन (वय ४३) यांनी भारती विद्यापीठ पोलिसात फिर्याद दिली. या प्रकरणात पोलिसांनी वैभव सातपुते या तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
वैशाली आणि आरोपी वैभव सातपुते यांच्यात प्रेमसंबंध होते. सातपुते याने तिला विवाहाचे आमिष दाखवले. काही काळानंतर त्याने संबंध तोडले आणि लग्नास नकार दिला. या फसवणुकीमुळे वैशाली नैराश्यात गेली. तिला मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागला. सततच्या तणावामुळे तिने आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला.
या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश मोहिते करत आहेत. पुढील चौकशी सुरू असून आरोपीवर कठोर कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी ध्रुव पाटील










































