पुणे गृहबाजार तेजीत दरवाढ आणि मागणीचा दबदबा कायम!

देशातील बहुतांश शहरांप्रमाणेच पुण्यातही गृहबाजार पुन्हा एकदा मजबूत स्थितीमध्ये आला आहे. प्रकल्पांची वेळेवर पूर्तता आणि ग्राहकांचा वाढता विश्वास यामुळे ‘सकारात्मक आणि संतुलित वाढ’ हे पुणे रिअल इस्टेटचे नवे वैशिष्ट्य बनले आहे.

एका प्रमुख सल्लागार संस्थेच्या ताज्या अहवालानुसार, देशातील आठ प्रमुख शहरांमध्ये जुलै ते सप्टेंबर २०२५ च्या तिमाहीत निवासी मालमत्तेच्या किमतीत सात ते १२ टक्क्यांपर्यंत मोठी वाढ झाली आहे. स्थिर व्याजदर आणि आगामी सणासुदीच्या उत्साहामुळे भारतीय रिअल इस्टेट क्षेत्रासह पुण्यातही सकारात्मक कल दिसून येत आहे.

पुण्यातील या वाढीमागे काही महत्त्वाचे घटक कार्यरत आहेत. आयटी आणि औद्योगिक क्षेत्रातील स्थिरता तसेच नोकरीच्या संधींमुळे हिंजवडी, खराडी, माण आणि बावधनसारख्या पट्ट्यात तरुण व्यावसायिक व स्थलांतरित कामगारांकडून घरांची मागणी लक्षणीय वाढली आहे. पुणे मेट्रोचा विस्तार आणि प्रस्तावित रिंगरोड यामुळे कनेक्टिव्हिटी सुधारली आहे,

ज्याचा थेट परिणाम मोशी, वाघोली, कात्रज आणि मांजरीसारख्या उपनगरांतील प्रकल्पांवर दिसून येतो. याशिवाय, कोथरूड, डीपी रोड आणि सदाशिव पेठ परिसरात पुनर्विकास प्रकल्पांनी प्रीमियम श्रेणीतील घरांची मागणी वाढवली आहे.

पुणे महानगरात या तिमाहीत घरांच्या किमतीत तब्बल ९ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. गेल्या वर्षी याच काळात सरासरी किंमत ६ हजार ६७१ रुपये प्रति चौरस फूट होती, जी आता ७ हजार २७० रुपये प्रति चौरस फूट झाली आहे. शिक्षण, रोजगार, आयटी क्षेत्राचा मजबूत पाया आणि मुंबईपेक्षा ४०-५० टक्के कमी दर यामुळे गुंतवणुकीसाठी पुणे हे मुंबईनंतरचे सर्वाधिक पसंतीचे ठिकाण ठरले आहे. तज्ज्ञांच्या मते, २०२६ पर्यंत पुण्यातील सरासरी घरांच्या किमतीत आणखी ८ ते १० टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे.

दरम्यान, देशाचे बांधकाम क्षेत्र एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर उभे आहे. एका उद्योग अहवालात वर्तवलेल्या अंदाजानुसार, २०४७ पर्यंत या क्षेत्राचे बाजारमूल्य ५ ते १० ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, तसेच देशाच्या एकूण जीडीपीमध्ये या क्षेत्राचा वाटा १४ ते २० टक्के इतका मोठा असेल.

हा वाढीचा कल केवळ निवासी बाजारापुरता मर्यादित नसून, कार्यालयीन, औद्योगिक आणि वेअरहाऊसिंग क्षेत्रावरही त्याचा प्रभाव दिसेल, ज्यामुळे देशातील विकासाचे केंद्रबिंदू मोठ्या महानगरांपलीकडे विस्तारत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे