पुणे शहरातील पीएमपी बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांना टार्गेट करून चोरट्यांनी दीड लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरी केल्याच्या तीन घटना उघडकीस आल्या आहेत. नगर रस्ता, विश्रांतवाडी आणि वाकडेवाडी परिसरात या चोर्यांची नोंद झाली असून, बसमधील गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी हे गुन्हे केले आहेत.
यापैकी एका घटनेत येरवडा पोलीस ठाण्यात एका ज्येष्ठ महिलेने तक्रार दाखल केली असून, बसमधून प्रवास करताना त्यांच्या गळ्यातील ७५ हजार रुपयांची सोन्याची साखळी चोरीला गेली आहे. दुसऱ्या घटनेत विश्रांतवाडी भागात एका महिलेची ३० हजार रुपयांची बांगडी कटरने कापून चोरण्यात आली, तर तिसऱ्या घटनेत वाकडेवाडी येथे बसमध्ये चढताना महिलेच्या गळ्यातील ५६ हजार रुपयांचे दागिने चोरीले गेले.
या घटनांमुळे महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याशिवाय, स्वारगेट एसटी स्थानकात एका तरुणाचा मोबाईलही हिसकावण्यात आला आहे, ज्यामुळे प्रवाशांमध्ये सुरक्षिततेबाबत चिंता वाढली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी चैतन्य पगारे













































