PMRDA मध्ये मोठ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या; अनधिकृत बांधकामांच्या विभागाला धक्का!

PMRDA Officer Transfers Impact illegal Construction Control
अनधिकृत बांधकामांच्या विभागाला धक्का;

PMRDA Officer Transfers Impact illegal Construction Control: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात (PMRDA) नुकत्याच झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विशेषतः प्राधिकरणाच्या अनधिकृत बांधकाम व निर्मूलन विभागाला या बदलांचा मोठा फटका बसला आहे. एकापाठोपाठ एक वरिष्ठ अधिकारी बदलून गेल्याने किंवा सेवानिवृत्त झाल्याने या महत्त्वाच्या विभागातील कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दक्षता अधिकारी अमोल तांबे यांची लातूर जिल्हा अधीक्षक पदावर बदली झाल्याने या बदली सत्राला सुरुवात झाली. त्यांच्यापाठोपाठ उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदारांसह अन्य अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश राज्य शासनाने जारी केले आहेत. यांमध्ये उपजिल्हाधिकारी प्रमोद कुदळे यांची सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात उपविभागीय अधिकारीपदी तर तहसीलदार सचिन म्हस्के यांची महाबळेश्वर येथे तहसीलदार म्हणून बदली झाली आहे. हे दोन्ही अधिकारी प्रतिनियुक्तीवर PMRDA मध्ये कार्यरत होते.

याशिवाय, PMRDA च्या अनधिकृत बांधकाम विभागाचे अप्पर जिल्हाधिकारी संजय गायकवाड आणि कार्यकारी अभियंता शशिकांत कुलकर्णी हे ३० जून रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. विशेष म्हणजे, अप्पर जिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती मिळाल्यानंतर अवघ्या दीड महिन्यातच संजय गायकवाड यांना सेवानिवृत्त व्हावे लागले. कार्यकारी अभियंता शीतल देशपांडे यांची ग्रामविकास विभागात बदली झाली असून, त्यांच्या जागेवर स्नेहा हब्बू रुजू झाल्या आहेत.

महत्त्वाची बाब म्हणजे, बदली झालेल्या अनेक रिक्त जागांवर अद्याप कोणाचीही नियुक्ती झालेली नाही. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न सध्या ऐरणीवर असताना, या विभागातील अधिकाऱ्यांची कमी संख्या PMRDA च्या कामकाजासाठी एक मोठे आव्हान ठरू शकते. या रिक्त जागा कधी भरल्या जातात आणि त्याचा अनधिकृत बांधकामांवरील कारवाईवर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे