गोल पोस्ट गुन्हा पुण्यात पोलीसच असुरक्षित? गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; डेक्कन परिसरात मध्यरात्रीची...

पुण्यात पोलीसच असुरक्षित? गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; डेक्कन परिसरात मध्यरात्रीची घटना

पुणे – शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागरिक अस्वस्थ आहेतच, पण आता स्वतः पोलिसांवरच हल्ले होत असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. गुन्हे शाखा युनिट-३ मध्ये कार्यरत असलेल्या पोलीस हवालदार अमोल काटकर यांच्यावर लॉ कॉलेज रोड परिसरात कोयत्याने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना रविवारी मध्यरात्री घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, अमोल काटकर (बकल क्र. 7835) हे शनिवारी रात्री ड्युटी संपवून आपल्या दुचाकीवरून घरी जात होते. त्यावेळी रात्री साधारण १ वाजताच्या सुमारास, लॉ कॉलेजसमोर दोन व्यक्ती दुचाकीवरून आले आणि अज्ञात कारणावरून त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. हल्ल्यात काटकर यांच्या डोक्याच्या मागील बाजूस गंभीर जखम झाली असून त्यांना तातडीने उपचारासाठी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, ‘कट मारल्याच्या’ वादातून हा हल्ला झाला असावा, अशी चर्चा सुरू आहे. हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले असून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.

घटनेची माहिती मिळताच डेक्कन पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि गुन्हे शाखा युनिट-३चे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासण्याचे काम सुरू असून, आरोपींचा माग काढण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे.

या घटनेमुळे पुन्हा एकदा पुण्यात पोलिसांच्याच सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यावरच असा हल्ला होणे हे गंभीर आणि धक्कादायक असल्याचे पोलिस वर्तुळातून सांगण्यात येत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी दिनेश वढणे

error: Content is protected !!
Exit mobile version