पुणे, ८ जानेवारी २०२३ : शहरात विविध मार्गांतून २०२२ मध्ये तस्करी झालेले पावणेचार कोटींचे तब्बल ८२३ किलो अमली पदार्थ रांजणगाव एमआयडीसीत नष्ट करण्यात येणार असल्याची माहिती अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिली आहे. तस्करांकडून गांजा, चरस, मेफड्रोन, ब्राऊन शुगर, अफू, एलएसडी यांसारख्या अमली पदार्थांची विक्री केली जाते.
त्या पार्श्वभूमीवर अमली पदार्थांविरोधी पथकांनी २०२२ मध्ये तब्बल ८२५ किलोवर ड्रग्ज जप्त केले होते. त्यामध्ये सर्वाधिक ८१८ किलो गांजाचा समावेश आहे. हेरॉईन १ किलो ११० ग्रंम, चरस ३ किलो अशा बऱ्याच अमली पदार्थांचा समावेश होता. जप्त केलेल्या ड्रग्जची किंमत ३ कोटी ७५ लाखांवर आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार ड्रग डिस्पोजल कमिटीसह वरिष्ठ पोलिस अधिकारी, पोलिस ठाण्याअंतर्गत वरिष्ठ निरीक्षकांच्या उपस्थितीत अमली पदार्थ जाळले जाणार आहेत.
पुणे पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकांनी २०२२ मध्ये सर्वाधिक ८२३ किलोंवर ड्रग्ज जप्त केले आहेत. अमली पदार्थ नष्ट करण्याची कारवाई पोलिस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या पथकांकडून केली जाणार आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर