Public Demand Culpable homicide against Dinanath Hospital: पुण्यात एका गर्भवती महिलेच्या झालेल्या हृदयद्रावक मृत्यूने शहरात संतापाची लाट उसळली आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या निष्काळजीपणा आणि अमानुष वर्तणुकीमुळे एका निष्पाप जीवाला मुकावे लागल्याने नागरिकांमध्ये तीव्र आक्रोश आहे. रुग्णालयाने उपचारासाठी अनामत रक्कम नसल्यामुळे महिलेला दाखल करण्यास नकार दिला, ज्यामुळे तिचा नाहक बळी गेला, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. मात्र, या गंभीर घटनेनंतर दीनानाथ रुग्णालय प्रशासनाने निर्लज्जपणाची परिसीमा गाठली आहे. त्यांनी मृत महिलेच्या कुटुंबीयांकडूनच रुग्णालयाची बदनामी होत असल्याचा धक्कादायक आरोप केला आहे.
या संदर्भात रुग्णालयाने सरकारला सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे की, २८ मार्चच्या दुपारनंतर रुग्णाचे काय झाले, याची माहिती डॉ. घैसास आणि रुग्णालय प्रशासनाला नाही. तसेच, भिसे कुटुंबीयांनी रुग्णालयाची बदनामी केली आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.
परंतु, महिलेच्या पतीने दिलेल्या माहितीनुसार, ते पत्नी आणि नातेवाईकांसोबत २८ मार्च रोजी सकाळी ११:३० वाजता डॉ. घैसास यांच्या दवाखान्यात गेले होते. तपासणीत महिलेची प्रकृती ठीक असतानाही डॉक्टरांनी तिला देखरेखेसाठी रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. सात महिन्यांची जुळी मुले आणि महिलेच्या जुन्या आजारांची गुंतागुंत लक्षात घेता, सिझेरियन शस्त्रक्रियेसाठी १० ते २० लाखांचा खर्च येऊ शकतो, असे डॉक्टरांनी सांगितले. यावर महिलेच्या पतीने तिला दाखल करण्याची विनंती करत डॉ. केळकर यांना फोन करून आपली अडचण सांगितली. डॉ. केळकर यांनी शक्य तेवढे पैसे भरण्यास सांगून डॉ. घैसास यांच्याशी बोलण्याचे आश्वासन दिले होते.
रुग्णालय प्रशासनाने असा दावा केला आहे की, रुग्णाचे नातेवाईक रुग्णालय प्रशासनाला किंवा चॅरिटी विभागात प्रत्यक्ष भेटले नाहीत. पैशांची व्यवस्था न झाल्यास महिलेला ससून रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला होता. गुंतागुंतीची शस्त्रक्रिया आणि कमी दिवसांच्या गर्भाची काळजी ससूनच्या सिझेरियन विभागात व्यवस्थित होऊ शकते, असे त्यांना सांगण्यात आले होते. रुग्णालयातील पलास नावाच्या व्यक्तीने महिलेच्या पतीला फोन केला, परंतु त्यांनी तो उचलला नाही, असा खुलासा रुग्णालयाने केला आहे.
या गंभीर प्रकरणाच्या चौकशीसाठी शासनाने आरोग्य सेवा पुणे मंडळाचे उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली आहे. या समितीत डॉ. प्रशांत वाडीकर, डॉ. नागनाथ यम्पल्ले, डॉ. नीना बोराडे आणि डॉ. कल्पना कांबळे यांचा समावेश आहे. ही समिती दीनानाथ रुग्णालयातील या घटनेची कसून चौकशी करणार आहे.
दरम्यान, या घटनेमुळे संतप्त झालेल्या विविध सामाजिक संघटनांनी शुक्रवारी रुग्णालयासमोर आंदोलन केले. भाजप महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी डॉ. सुश्रुत घैसास यांच्या दवाखान्याची तोडफोड केली. आंदोलकांनी रुग्णालयासह महापालिका प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. आरोग्य व्यवस्थेतील नफेखोरी आणि व्यापारीकरण थांबवण्याची मागणी करणारे फलकही यावेळी दाखवण्यात आले. पतित पावन संघटनेसह अनेक सजग नागरिकांनी निषेध व्यक्त करत आपल्या भावना सोशल मीडियावरही व्यक्त केल्या आहेत. या घटनेमुळे आरोग्य व्यवस्थेतील माणुसकी हरवल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे