Public Urination Case Pune: शहराच्या मध्यभागी असलेल्या वर्दळीच्या चौकात आलिशान कार थांबवून सिग्नलच्या खांबावर लघुशंका करणाऱ्या घटनेने पुणे शहरात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलिसांनी गौरव आहुजा आणि त्याचा मित्र भाग्येश ओसवाल यांना अटक केली होती. या घटनेतील आरोपी भाग्येश ओसवाल याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन.एस. बारी यांनी ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला आहे. मात्र, या घटनेतील मुख्य आरोपी गौरव आहुजा याच्या जामीन अर्जावर येरवडा पोलिसांनी म्हणणे मांडण्यासाठी न्यायालयाकडे मुदत मागितल्याने आहुजाला आणखी काही दिवस तुरुंगातच राहावे लागणार आहे.
गौरव आहुजाने मद्यधुंद अवस्थेत भर चौकात कार थांबवून लघुशंका केली होती. तसेच, त्याने अश्लील चाळेही केले होते. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी गौरव आहुजा आणि भाग्येश ओसवाल यांच्याविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली होती. त्यानंतर दोघांनाही न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर दोघांनीही जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता.
या घटनेमुळे शहरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली होती. भरचौकात अशाप्रकारे सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. या घटनेमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे