पुणे, २५ डिसेंबर २०२२: कट आणि कव्हर पद्धतीचा अवलंब करीत पुणे रेल्वे प्रशासनाने केवळ ५ तासात रोड अंडर ब्रिज बांधला आहे. १.५ मीटर व २ मीटरच्या आकाराचे सिमेंटचे बॉक्स ठेवून हा पूल बांधण्यात आला आहे. यात कट आणि कव्हर पद्धतीत रूळ तोडून पुन्हा जोडले जातात. त्यामुळेच या पद्धतीस ‘कट आणि कव्हर’ पद्धत असे म्हटले जाते. या पद्धती चा अवलंब केल्याने पुणे रेल्वे प्रशासनास अगदी कमी वेळात ३० मीटर लांबीचा अंडर ब्रिज बांधता आला.
याबाबत माहिती देताना पुणे रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी सांगितले की, कामशेत स्थानकाजवळील रोड अंडरब्रिजचे काम करण्यात आले. रेल्वेने ब्लॉकसाठी जो वेळ ठरवला होता त्या वेळेतच हे काम पूर्ण झाले आहे. या कामादरम्यान, शुक्रवारी गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांची थोडी गैरसोय झाली होती. मात्र, आता ब्लॉक पूर्ण होताच, पहिल्यांदा त्या पुलावरून मालगाडी सोडून कामाची तपासणी करण्यात आली. ट्रॅक फिट असल्याचे सर्टिफिकेट दिल्यानंतर ताशी १० किमी या वेगाने प्रवासी गाड्या धावण्यास सुरुवातही झाली आहे.
पुढे ते म्हणाले, या कामामुळे मोडकळीस आलेल्या पुलाच्या जागी नवा मजबूत पूल तयार झाल्याने रुळांची सुरक्षितता वाढली आहे. तसेच भुयारी मार्गातूनही वाहनधारकांना जाणे येणे सोपे झाले असल्याचे झंवर यांनी यावेळी सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ऋतुजा पंढरपुरे