Pune Railway Station, दररोज लाखो प्रवाशांची वर्दळ असलेलं एक महत्त्वाचं केंद्र. मात्र, या गजबजलेल्या स्थानकावर प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतीही चोख व्यवस्था नाही, फलाटांवर ये-जा करण्यासाठी अनेक छुपे मार्ग सर्रास वापरले जातात आणि सुरक्षा तपासणी यंत्रणाही पुरेशी नसल्याने प्रवाशांचा जीव धोक्यात आहे.
रेल्वे स्थानकाला दहाहून अधिक प्रवेशद्वारं आहेत, पण बॅग तपासणीसाठी केवळ तीनच स्कॅनिंग मशीन उपलब्ध आहेत. त्यापैकीही अनेकदा मशीन बंद असल्याचं दिसतं किंवा कर्मचारीच गैरहजर असतात. त्यामुळे ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशी अवस्था झाली आहे. आरक्षण केंद्राजवळून विनातिकीट प्रवाशांची घुसखोरी सुरू आहे. प्रवाशांच्या बॅगांची तपासणी होत नसल्याने कोणीही कोणत्याही वस्तू सहजपणे घेऊन जाऊ शकतं, ज्यामुळे भविष्यात मोठ्या धोक्याची शक्यता नाकारता येत नाही.
एकीकडे रेल्वे प्रशासनाकडून सुरक्षा वाढवल्याचे दावे केले जातात, तर दुसरीकडे फलाटांवर गर्दीचं प्रचंड प्रमाण असूनही सुरक्षा रक्षकांची संख्या अपुरी आहे. यामुळे पाकीटमारी आणि चोरीच्या घटना वाढल्या आहेत. रात्री-अपरात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जीव मुठीत धरून राहावं लागतं. रेल्वे स्थानकावर फुल बॉडी स्कॅनर, प्रत्येक प्रवेशद्वारावर बॅग तपासणी आणि आरपीएफ कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याची मागणी विभागीय रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यांकडून केली जात आहे. भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यावरच रेल्वे प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे
