“The roar of Maharashtra will now echo in every school.”
निढळाच्या घामाने भिजला…
देश गौरवासाठी झिजला…
दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र..
महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास आणि निर्भिड वृत्ती सांगणाऱ्या या ओळी आता प्रत्येक शाळेत घुमणार आहेत. कारण, महाराष्ट्र सरकारने सर्व शाळांमध्ये ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत गाणे सक्तीचे केले आहे. हा निर्णय फक्त राज्य मंडळाच्या शाळांपुरताच मर्यादित नाही, तर केंद्रीय आणि आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या शाळांनाही याची अंमलबजावणी करावी लागणार आहे.
राज्यगीत का झाले सक्तीचे?
महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना आपल्या राज्याचा इतिहास आणि संस्कृती याची ओळख व्हावी, हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे. शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी या निर्णयाची व्याप्ती वाढवली आणि सर्व प्रकारच्या शाळांमध्ये राज्यगीत अनिवार्य केले. शासनाच्या निर्णयानुसार, शाळेचे दैनिक सत्र सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत, परिपाठ, प्रार्थना आणि प्रतिज्ञेसोबतच राज्यगीत गायले जाणे बंधनकारक आहे.
शिक्षण विभागाची करडी नजर
राज्याचे शिक्षण सहसंचालक (प्राथमिक) रमाकांत काठमोरे यांनी याबाबत कडक निर्देश दिले आहेत. याआधीही शाळांना सूचना देण्यात आल्या होत्या, पण काही ठिकाणी अंमलबजावणी झाली नव्हती. आता विभागीय उपसंचालकांना हे निर्देश गांभीर्याने घेऊन तातडीने अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. यामुळे प्रत्येक शाळेत राज्यगीत वाजते की नाही, याची तपासणी होणार आहे.
राज्यगीताचा गौरव
‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत गीतकार राजा बढे यांनी लिहिले असून, श्रीनिवास खळे यांनी त्याला संगीत दिले आहे. शाहीर साबळे यांच्या बुलंद आवाजात हे गीत गायले गेले आणि ते महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकारले गेले. “भीती न आम्हा तुझी मुळी ही, गडगडणाऱ्या नभा” अशा ओळींमधून महाराष्ट्राच्या निर्भिड स्वभावाचे दर्शन घडते. आता हाच गौरवशाली वारसा शाळांमधून पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणार आहे.
हा निर्णय म्हणजे फक्त नियम नाही, तर आपल्या राज्याच्या अभिमानाचा आणि संस्कृतीचा एक भाग आहे. शाळांमधून या गीताच्या सुरांनी प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात महाराष्ट्राबद्दलचा आदर आणि प्रेम वाढेल, असा विश्वास आहे.
