पुणे रेल्वेस्टेशन उडविण्याची धमकी, एक्स्प्रेस थांबविली; प्रवासी तणावात

पुणे, १४ जानेवारी २०२३ : महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी असलेले पुणे रेल्वेस्थानक उडवून देण्याची धमकी अज्ञात व्यक्तीने फोन करून दिली आहे. या धमकीच्या फोनमुळे रेल्वेस्थानकाभोवती घबराटीचे वातावरण आहे. धमकीचा फोन आल्यानंतर लगेचच रेल्वे पोलिस आणि पुणे पोलिसांनी एक्स्प्रेस गाडी स्थानकावर थांबविली आणि बॉंब शोधण्यासाठी तातडीने श्वानपथकाला पाचारण केले. या वृत्तानंतर प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. ते तातडीने रेल्वेस्थानकाबाहेर धावले.

त्यानंतर लगेचच रेल्वे पोलिसांच्या श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. संपूर्ण रेल्वे प्लॅटफॉर्म, रेल्वे ट्रॅक, प्लॅटफॉर्मवर असलेली प्रत्येक खोली आणि एक्स्प्रेस ट्रेनच्या प्रत्येक डब्याची झडती घेण्यात आली. पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. यानंतर पोलिसांनी प्रवाशांना रेल्वेस्थानकात प्रवेश दिला. या वृत्तानंतर रेल्वेस्थानकाची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. कोणतीही संशयित वस्तू किंवा व्यक्ती दिसल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

रेल्वेस्टेशन उडविण्याची धमकी देणारा फोन कोणी केला? हा फोन आला कुठून? त्याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. पोलिसांचा तपास सुरू आहे. रेल्वेस्थानकात येणाऱ्या-जाणाऱ्यांवर कडक नजर ठेवण्यात आली आहे. रेल्वे प्रशासन अलर्ट मोडवर आहे. २६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन आहे. अशा वेळी दहशतवाद्यांकडून नापाक कारवाया करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे पुणे रेल्वेस्थानक, कामशेत रेल्वेस्थानकावर सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडेकोट ठेवण्यात आली आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा