नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बस मालकांवर पुणे आरटीओची धडक कारवाई, कारवाईत मोठा दंड वसूल

पुणे, ७ जुलै २०२३ : मागील आठवड्यात बुलढाणा येथील सिंदखेड राजाजवळ मध्यरात्री भीषण अपघात झाला. खासगी ट्रॅव्हलच्या बसच्या झालेल्या अपघातात २५ जणांचा होरपळून मृ्त्यू झाला होता. या अपघातानंतर खासगी बसेस आणि प्रवाशांची सुरक्षितता हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक विभागाने नियमभंग करणाऱ्या खासगी प्रवाशी वाहतुकीवरील कारवाई तीव्र केली आहे. त्यासाठी विशेष तपासणी मोहीमसुद्धा सुरु केली आहे.

पुणे उपप्रादेशिक परिवहन विभागाने शहर आणि जिल्ह्यातून सुटणाऱ्या ट्रॅव्हल्सची तपासणी सुरु केली आहे. सर्व खाजगी ट्रॅव्हल्सचा आपत्कालीन दरवाजा, वेग नियंत्रक उपकरणाची आरटीओकडून तपासणी करण्यात येणार आहे. तसेच पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून नियमभंग करणाऱ्या खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेसवर कारवाई केली जात आहे.

पिंपरी चिंचवड आरटीओकडून खासगी बसेसची तपासनी साठी दोन वायूवेग पथकांनी निर्मिती केली होती. या वायूवेग पथकाने ४५ दिवसांत १४६ बसेसवर कारवाई केली आहे. पथकाने ४५ दिवसांत ३६३ प्रवासी बसेसची तपासणी केली. यामध्ये एकूण १४६ वाहने दोषी आढळली. त्यांना १२ लाख ६५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. राज्यभरातील खासगी कंत्राटी प्रवासी बसेस तपासणीची विशेष मोहीम परिवहन विभागाकडून हाती घेतली आहे.

पुणे शहर विद्येचे माहेरघर आहे. त्याचबरोबर शहरात राज्यभरातून नागरिक येतात. काही विद्यार्थी शिक्षणासाठी तर अनेक जण नोकरीसाठी येत आहेत. यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातून येणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. या मार्गावर रेल्वेची संख्या कमी प्रमाणात असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर खाजगी ट्रॅव्हल्सने वाहतूक सुरु असते. यामुळे सर्व ट्रॅव्हलची तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीत त्रुटी आढळल्यास त्या ट्रॅव्हल्सवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा